दामू टेलर / गोना स्पेशालिस्ट (भाग 1)

मित्रांनो असे दुनियेत भरपूर लोक आहेत ज्यांचे म्हातारपण अतिशय हालाखीच्या परिस्थितीत जाते,  त्यांची मुले सेवा करित नाहीत किंवा कधीकधी तर खायला प्यायला देत नाहीत।

नेहमी वर्तमानपत्रात आपण बातम्या वाचतो की मोठमोठ्या लोकांचे आईवडील हे वृद्धाश्रमात राहतात,  आज अश्याच एका व्यक्तीची गोष्ट तुम्हाला सांगणार आहो की ज्या व्यक्तीने वयाच्या 60 व्या वर्षी जेव्हा त्यांना त्यांच्या मुलांनी घराबाहेर काढले तेव्हा स्वतःचा एक छोटासा लघुउद्योग सुरू केला व मरेपर्यंत इज्जतीने आयुष्य जगले,  ही कथा वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा उद्देश एवढाच आहे की आपले म्हातारपण आपल्या मुलांवर न लादता आपल्याजवळ मरेपर्यंत काही संपत्ती राखून ठेवावी जेणेकरून आपल्याला दुसऱ्यावर अवलंबून राहता कामा नये।  तसेच माणूस म्हातारपण आले म्हणून संपत नसतो तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत काहीपण करू शकतो।

जे तरुण नोकरी नाही म्हणून नैराश्याच्या कचाट्यात सापडले असतील त्यांना या कथेतून नक्कीच प्रेरणा मिळेल।

दामू टेलर / गोना स्पेशालिस्ट

तर ही कहाणी आहे दामूची,  तो एका खेडेगावात राहत होता।

लहानपणीच त्याचे आईवडील वारले म्हणून दामूचे बालपण अत्यंत कष्टात गेले।   आईवडील नसलेला दामू आपल्या मामाकडे राहायचा व मामाच्या शेतात गुराढोरासारखे काम करी,  अत्यंत लहान वयात दामू सर्व शेतीची कामे करीत असे व त्यामुळे मामाला चांगले उत्पन्न होई।   दामू सकाळी 5 वाजता उठायचा नंतर गुराढोरांची सफाई,  गोठ्याची सफाई करून  बाजारात भाजीपाला घेऊन जायचा।  परत पुन्हा शेतात जे काही कामे असतील ते करायचा।  

दामू शेतीच्या कामाव्यतिरिक्त पैलवानकी करीत असे,  तरूणवयात त्याने कमालीचे शरीर कमाविले होते,  सर्वजण गावात त्याला दाम्या असे म्हणत असत।

त्यांच्या गावात एक भजन महाराज होते,  महाराज गावोगावी भजन करीत असत आणि जेव्हा भजन नसले तर रिकाम्या वेळात शिवणकाम करीत।   भजन महाराजांकडे एक शिवणकाम करणारी मशीन होती त्यावर ते कपडे शिवत व जे आले ते शिवण्याचे काम करीत।

दामूला भजनाची आवड होती म्हणून तो महाराजांचे भेटीला व आशिर्वाद घ्यायला जात असे पण त्याचे त्या कपडे शिवायच्या मशीनकडे विशेष आकर्षण होते।   एक दिवस त्याने त्यांच्याकडे शिवणकाम शिकण्याची इच्छा सांगितली तर महाराजांनी होकार दर्शवला व रोज त्याला फावल्या वेळात शिवणकाम शिकवित।

इकडे मामाही दामूवर जाम खूश होता,  दामूसारखा मुलगा लाखात एक आहे हे हेरून मामाने आपल्या थोरल्या मूलीचे लग्न दामूशी लावून दिले व दामूला सुखी संसारासाठी आपल्या जमीनीचा 5  एकरचा तुकडा दिला।  दामूने लग्न झाल्यानंतर अजून मेहनत केली व अजून 25 एकर शेती विकत घेतली।

दामूची बायको सुद्धा मेहनती होती, त्यांना 6 मुले होती त्यापैकी 4 मुली आणि 2 मुलं।  दामूचं अख्ख आयुष्य मेहनत करण्यात गेलं त्याने आपल्या मुलाबाळांना काहीही कमी पडू दिलं नाही,  दामू ज्या भजन महाराजांकडे जायचा त्यांनी दामूच्या लग्नाच्या वेळी त्याला एक शिवणकाम मशीन भेट म्हणून दिली होती,  तर दामू कधीकाळी घरगुती फाटलेले काही कपडे त्यावर शिवत असे,  सोबत शेतीकामासाठी लागणारी थैल्यांच्या फाड्या आणि गोना ही मशीनवर शिवत असे।

(फाडी म्हणजे युरीया किंवा सुफल्यांच्या रिकाम्या थैल्यांना जोडून बनविलेली एक चौकोनी आकाराची चादर। ही शेतकरी लोक कापूस वेचण्याकरिता वापरतात।

तर गोना म्हणजे खूप सार्‍या फाड्यांना जोडून बनविलेली सतरंजी , याचा उपयोग धान्य झाकण्यासाठी किंवा वाळविण्यासाठी होतो)

बाकी काही त्या मशीनचा उपयोग करत नव्हता पण दामूच्या हातच्या फाड्या व गोने फाटत नसत म्हणून त्याच्याकडे भरपूर लोक येतं , तेव्हा जर तो रिकामा असला की लोकांना फुकटात ते शिवून देत असे ,   कारण त्याच्याकडे पैशाला कमी नव्हती तर तो सर्वांची मदत करण्याचा प्रयत्न करी।

शेवटी पोरं मोठी झाली , दामूच्या सर्व मुलांची लग्ने झाली,  त्याच्या चारही मुली देखण्या असल्यामुळे व दामूची समाजात प्रतिष्ठा होती त्यामुळे अतिशय चांगल्या संपन्न घराण्यात त्यांची लग्ने झाली।

दोन मुलांपैकी एक मुलगा सरकारी अधिकारी होता आणि लहान मुलगा वडीलांचा वारसा चालवत शेती करायचा शिवाय राजकारणात तो अँक्टिव होता।

असं सगळं मस्त चाललेले होते दामू गावात लहान मुलाच्या कुटुंबासोबत राही व काही सामाजिक कामे करायचा,  सर्व शेती त्याने लहान मुलाला देऊन टाकली व जबाबदारीतून मुक्त झाला।

दामूची बायको गंगा दामूप्रमाणे म्हातारी झाली होती,  एकदा गंगा  धाकट्या मुलीच्या बाळंतपणाला मुलीकडे गेली कारण तिच्याकडे करायला कोणी नव्हते व बाळ मोठे होईपर्यंत एक ते दीड वर्ष तिकडेच राहली,  गंगाला सोने चांदी च्या दागिन्यांची खूप हौस होती त्यामुळे ती कुठेही गेली तरी सर्व दागिने सोबत घेऊन जायची। यावेळी सुद्धा ती सर्व दागिने घेऊन आली होती।

आणि याचे दुसरे कारण म्हणजे तिचा तिच्या सुनबाईवर विश्वास नव्हता म्हणून मुलीला तिने आपले सर्व दागिने ठेवायला दिले।  गंगाची लहान मुलगी अतिशय श्रीमंत होती तिचा नवरा व दीर व जाऊबाई तिघेही डाँक्टर होते व त्यांचा शहरात खूप मोठा दवाखाना होता,   त्यामुळे तिची मुलगी व जावई गंगाची खूप काळजी घ्यायचे  पण एक दिवस गंगा बाथरूममध्ये पाय घसरून पडली व तिचा पाय मोडला।  तिच्यावर उपचार झाल्यानंतर काही दिवसांनी पाय बरा झाला, पण गंगाला पहिल्यासारखे चालता येत नव्हते।

नंतर काही महीन्यांनी ती जेव्हा दामूसोबत देव दर्शनाला गेली तेव्हा तिचा अचानक हार्ट अटँक ने मृत्यू झाला।

पत्नीच्या मृत्यूनंतर दामू खूप खचला होता पण त्याने स्वतःला धीर दिला, व हसत खेळत समोरचे आयुष्य जगायचे ठरवले।

गंगाच्या आठवणीत दामूने आपल्या खोलीत तिच्या फोटोखाली एक उखाणा लिहून ठेवला होता जो गंगा ने त्यांच्या लग्नाच्या वेळी घेतला होता,    

“ ताकदीचा पैलवान हायं जो ,कोणं घेत नाही ज्याच्याशीं पंगा ।

दाम्या पैलवानाचं नावं घेते त्यांची बायको गंगा  ।।“

दामू रोज हा उखाणा वाचायचां व कधी हसायचा कधी रडायचा।

गंगाच्या मृत्युनंतर दामूच्या धाकट्या मुलीने गंगाचे दागिने ठेवून घेतले त्यामुळे गावाकडच्या सुनेचा तिच्याशी वाद झाला,  तसेच ते आईचे दागिने एकटीनेच बळकावल्यामुळे दामूच्या पोरींची आपापसांत भांडणे झाली।

दामूच्या धाकट्या सूनेने सासू सासऱ्यांची म्हातारपणी खूप सेवा केली होती म्हणून तिला त्या सासूच्या दागिन्यांची आस होती व गंगाकडचे दागिने खूप मौल्यवान होते,  तिला दागिन्यांची चांगली पारख होती म्हणून ती नवीनवीन दागिने आपल्या सोनाराकडून बनवून घ्यायची शिवाय गंगाकडे तिच्या आईचे जुन्या काळातील अतिशय मौल्यवान दागिनेही ही होतेच।

त्या रागा मुळे सून दामूशी आता बरोबर बोलायची नाही व मुलगा सूनेचेच ऐकत होता,  काही दिवसांनी तर दामूला जेवणाचे ताट स्वतः वाढून घ्यावे लागायचे,  त्याला जेवायला कोणी बोलवत नव्हते ।

थोडक्यात दामूचा खूप मोठा अपमान झाला होता त्याला मुलाला सर्व शेती लिहून देण्याचा निर्णय चुकला असे वाटायला लागले।

नंतर तो सरकारी अधिकारी असलेल्या मोठ्या मुलाकडे गेला व त्याला सर्व हकीकत सांगितली पण त्या मुलाने दामूला म्हटले कि, “ बाबा तुम्ही सर्व शेती धाकट्याला दिली ,मला एक शब्दही विचारला नाही आणि मी स्वतः शिकून मोठा झालो व आता तुम्ही म्हातारपणात माझ्याकडे राहायला कशाला आलात? “

दामूच्या डोळ्यांत पाणी आलं,  मोठ्याची गोष्ट खरी होती पण दामूला वाटलं की मोठा मुलगा सरकारी अधिकारी आहे,  बंगला गाडी ,नोकर चाकर सर्व असताना तो बापाच्या शेतीत कशाला रस घेईल ?  म्हणून दामूने हा विचार करून धाकट्याला सर्व शेती दिली होती।

पण तो आता करणार काय?  कुठ जाईल?

मुलींचे आधीच दागिन्या वरून भांडणे चालू होती त्यामुळे त्याने कोणत्याही मुलीकडे जाणे टाळले,  दामू स्वतःच्या हिंमतीवर कष्ट करून जगणारा माणूस होता त्याला कोणी केलेला अपमान पचायचा नाही।

मोठा मुलगा बोलून आँफिसला गेला नंतर मोठ्या सूनबाईने दामूला जेवण वाढले।

एवढं सगळं झाल्यावर तिकडे काही खाण्याची दामूची अजिबात इच्छा नव्हती पण सुनबाई ने खूप आग्रह केला,

“ मामाजी त्यांच्या बोलण्याकडे तुम्ही अजिबात लक्ष देऊ नका,  आता तुम्ही इकडेच राहा, राग गेल्यावर तेच तुम्हाला माफी मागतील,  मी सुद्धा त्यांच्याकडून तुमची माफी मागते “

थोरली सून चांगली होती,  मोठ्या मुलाने आंतरजातीय प्रेमविवाह केला होता त्यामुळे दामू मोठ्या सूनेशी जास्त बोलत नव्हता पण आता कठीण परिस्थितीत तीच सून त्याची काळजी करीत होती।

पण दामूने तिकडे जेवण केले नाही व जायला निघाला,  मोठी सूनबाई दामूला थांबवण्यासाठी विनवण्या करू लागली पण तो थांबला नाही।

“एक मदत करशील माझी ? थोडे पैसे असतील तर दे!  म्हणजे उसने म्हणून  दे मला ,  मी काही दिवसांनी तुला व्याजासहित परत करीन तोपर्यंत ही माझ्या गळ्यातील सोन्याची चैन तुझ्याकडे ठेव तारण म्हणून! “ दामू सूनबाई ला म्हणाला।

पण सूनबाई ने ती चैन घेतली नाही , दामूची अवस्था बघून तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहायला लागले।

सूनबाई ने त्याला 5 हजार रूपये दिले व स्वतःची काळजी घेण्याची विनंती केली।

दामू गावाकडे परतला व संपूर्ण प्रवासात तो  विचार करत होता,  कधीकधी रडत होता व त्याने मनाशी ठरविले कि असे परावलंबी आयुष्य जगणे कठीण आहे,  दुसर्‍यावर अवलंबून असलेल्या माणसाला कवडीची इज्जत मिळत नाही ।

दामूने वयाची साठी ओलांडल्यावर पुन्हा स्वतःच्या पायावर उभा होण्याचा निर्धार केला।

कथेचा उर्वरित भाग 2 लवकरच प्रसिद्ध केला जाईल।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: