प्रवास

बर्‍याच दिवसांपासून काही मित्रांचे मेसेजेस आले कि ‘ प्रवास ‘

या मराठी सिनेमाबद्दल लिहावे म्हणून,  त्यामुळे आज हा सिनेमा बघितला आणि सिनेमा बघतानां खरचं ही जाणीव झाली की जर हा सिनेमा बघितला नसतां तर खूप काही मिस झालं असतं ।

आयुष्यात आपण अनेक गोष्टींचे टेंशन घेऊन आयुष्य जगणे थांबवतो,  आयुष्याभर बायका मुलांसाठी काम करतो पण जेव्हा स्वतःसाठी जगण्याची वेळ येते तेव्हा म्हातारपण आलेलं असतं।

रिटायरमेंट नंतर असं वाटतं मस्त सुखी आयुष्य जगावं कारण मुले सेटल झालेली असतात व सगळं व्यवस्थित होऊन जातं पण म्हातारपण नवनवीन आजार घेऊन येतं व आपण आपले आयुष्य जगण्याची संधीच हिरावून बसतो।

अशाच एका नोकरी करणार्‍या मध्यमवर्गीय माणसांच्या रिटायरमेंट नंतर काय फरक पडतो,  व तो आपल्या आयुष्याची पुन्हा नवीन सुरुवात कशी करतो,  हे या ‘प्रवास’ या चित्रपटातून मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केलेला आहे ।

“प्रवास” या मराठी सिनेमाने सध्या हळूवार रित्या प्रेक्षकांची मने जिंकायला सुरूवात केली आहे. मुळातचं याच दिग्दर्शन व लेखन केलेल्या शशांक उदापूरकर यांनी कथेला योग्यरित्या हाताळलं आहे असचं म्हणावं लागेल. हल्ली अलीकडच्या धकाधकीच्या जिवणाच्या रणगाड्यात कुठेतरी ठराविक गोष्टी मिस होऊन जातात, पुढे ज्या टप्प्यात त्या पूर्ण करावयाच्या इच्छा दाटतात तिथे ऐनवेळी जबाबदाऱ्या खांद्यावर पडून पुन्हा सारं काही राहून जातं, अशाच काहीशा धांधल गडबडीतून एखादी वाट शोधून आपण कुठेतरी पूर्णत्वाला गेल्याचं आपल्याला कळल्यावर तिथे आपण थांबतो. पण मुळातच वयात आल्यावर (थोडक्यात वयस्क झाल्यावर) आयुष्यात मागे वळून पाहिल्यावर राहून गेलेल्या गोष्टींची खंत वाटून माणूस पुन्हा स्वप्नांमागे धावायचं ठरवू लागतो. अर्थातच ही अल्लड मनाची ओढ स्वस्थ बसूच देत नसते.

या चित्रपटामधून दिग्दर्शकाने अशाच काहीशा संमिश्र भावनांचं पुरेपूर चित्रण केलं आहे. साहजिकच आपले लाडके अशोक मामा काही ठिकाणी त्यांच्या हसवण्याच्या अंदाजात ह्युमरचा योग्य वापर करून जातात. सोबतच अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांनी त्यांच पात्र अगदी योग्य हाताळलं आहे. या चित्रपटात पाहुणे कलाकारांची भुमिका साकारणारे विक्रम गोखले तसेच श्रेयस तळपदे यांनीदेखील योग्य ठिकाणी येत आपला प्रभाव दृश्यांमधून पाडला आहे. एक गोष्ट मान्य करावी लागेल पटकथा जराशी विरळ वाटते परंतु ती प्रेक्षकाला शेवटपर्यंत दृश्यांवर नजरेला खिळवून ठेवते. अशा प्रकारच्या पटकथा सहसा दाक्षिणात्य सिनेमात अधिक प्रभावसाठी वापरल्या जातात. जिवणाचा अर्थ भासवून जाणारा आणि जरासा सिरीअस मोडवरून काहीतरी आशय देऊन जाणारा असा हा चित्रपट आहे. निर्विवादपणे सर्वच कलाकारांनी उत्कृष्ट अभिनय साकारलेला आहे. खऱ्या अर्थाने वस्तुस्थितीशी संबंध जोडून खेळत ठेवणारा हा चित्रपट म्हणावा लागेल.


                   चित्रपटाच्या कथेवर आवर्जून प्रकाश टाकणं गरजेचं आहे. कारण ही कथाच या सिनेमाचा आत्मा ठरलीये असं म्हणायला हरकत नाही. या कथेची रोचकता मनाला उद्गिग्न करून जाते. चित्रपटाच्या कथेतील नायक  असलेले अभिजात इनामदार हे एक जगण्याबद्दल विशेष ओढ असलेले व्यक्तिमत्त्व म्हणून आपल्यासमोर जेव्हा येते, तेव्हा त्या व्यक्तिमत्वाचा दिलखुलासपणे प्रेक्षक स्वीकार करतो. त्याच मुळ कारण म्हणालं तर या गोष्टीला मूर्त स्वरूप देण्यात शशांक उदापूरकर नक्कीच यशस्वी ठरलेत. “जे शेष आहे ते विशेष आहे” ही या सिनेमाची टॅगलाईन. या सिनेमाचा मुळ सार जरी या एका वाक्यात असला तरीदेखील जगणं विविध पैलूंवर आशादायी कसं असावं, याची प्रचिती नक्कीच हा चित्रपट देऊन जातो. अभिजात इनामदार (अशोक सराफ) आता आपलं निवृत्तीनंतरचं आयुष्य आपली बायको लता इनामदार (पद्मिनी कोल्हापुरे) यांच्यासोबत व्यतीत करत आहेत. एकुलता एक मुलगा दिलीप इनामदार नोकरीनिमित्ताने अमेरिकत राहतो. आयुष्यभर कुटुंबासाठी झटणारे अभिजात इनामदार आयुष्यातील शेवटच्या इनिंगमध्ये आता थकलेत. दोन्ही किडण्या निकामी झाल्याने आठवड्यातून दोन दिवस त्यांना सक्तीने डायलिसीस घेणे गरजेचे आहे. त्यांचं शरीर जरी थकलेलं असलं, तरी त्यांनी जगण्याची उमेद सोडलेली नाही.

आयुष्यात कामानिमित्ताने आपल्या आवडीनिवडी व इच्छा-आकांक्षा पूर्ण करू न शकलेला अभिजात एका प्रसंगानंतर आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यास सुरवात करतो. आपल्या जवळच्या खाजगी वाहनाला रूग्णवाहिका बनवून गरजूंसाठी मोफत सेवा देण्याचं काम अभिजात सुरू करतो. आजाराने त्रस्त असला तरी गरजूंना मदत करताना मिळणाऱ्या आत्मिक समाधानाने अभिजात आपलं आजाराचं दुःख कायमचं विसरतो. त्याच्या धडपडीला आधीतर लताचा थोडासा विरोध असतो, मात्र अभिजातसोबत त्याचं हे काम पाहिल्यावर तिलासुद्धा त्याच्या अशा गरजूंना आधार देण्याच्या वृत्तीचा अभिमानच वाटतो. उतारवयात आजाराने त्रस्त असूनही अभिजातने घेतलेला हा निर्णय योग्य होता का ? त्याने निस्वार्थी वृत्तीने समाजासाठी जे काम केलं आहे, त्यातील टप्प्यावर काय प्रसंग घडतात ? हे प्रश्न उलगडण्यासाठी तुम्हाला आवर्जून प्रवास हा चित्रपट नक्कीच पहावा लागणार आहे.

कथेसाठी एकूण गुणांकन:- 4.5/5
एकून अभिनयासाठी:- 4/5
दिग्दर्शन आणि मांडणी:- 3.5/5
ओव्हरआॅल चित्रपट:- 4/5

By – किरण बंडू पवार.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: