अश्या लोकांशी संगत केल्यास संपूर्ण जीवन उध्वस्त होऊ शकते

चुकीच्या माणसाशी संगत केल्यामुळे भल्याभल्यांना वाईट दिवस बघायला मिळालेले आहेत, जीवन हे एक रंगहीन पाण्यासारखे आहे त्यामध्ये जो रंग मिसळला तसे ते दिसणार आपल्या जिवनात येणारे मित्र, मैत्रिणी आपले सोबती ज्यांच्यासोबत आपण राहतो ते लोक आपल्या जिवनावर प्रभाव टाकत असतात।  आपण कोणासोबत राहतो ? आपल्या सोबत राहणारा व्यक्ती काय विचार करतो ?  यावर सगळे अवलंबून आहे म्हणून कधीही चुकीच्या माणसासोबत मैत्री ठेवू नये कारण चोरासोबत मैत्री करणाऱ्यालाही लोकं चोरचं म्हणतात ।

जर एक चांगली चारित्यवान असलेली मुलगी जीचा सगळे लोकं समाजात मान ठेवत असतील व ती जर एखाद्या चारित्यहीन मुलीसोबत राहायला लागली तर समाज तिच्याकडे कोणत्या दृष्टीकडे बघणार?  लोकांच्या नजरेतून ती उतरून जाणार व जसे त्या दुसर्‍या मुलीला समाजात वागणूक मिळते तशीच तिलापण मिळणार।

आपली संगत म्हणजे आपल्या व्यक्तीत्वाचा  आरसाच असतो जो आपण कसे आहोत हे लोकांना दाखवित असतो,  आता काही लोक म्हणतात कि,  ‘लोक काय म्हणतात याकडे लक्ष द्यायचे नसते’ मग जर असेच आहे तर जंगलात जाऊन राहा ना!  अरे  माणूस हा समाजशील प्राणी आहे त्याला खायला प्यायला अन्न लागते, घालायला कपडे लागतात  त्याचप्रमाणे सोबत राहायला, बोलायला माणसे लागतात व आपण जेव्हा आपल्या विचारांमुळे एक आदर्श निर्माण करतो तेव्हा हेच लोक आपल्याला मान देतात,  आपल्याला सन्माननीय समजतात व आपले अनुकरण करायला लागतात।

म्हणून आपले आचरण व आपली संगत ही अव्वल दर्जाची असली पाहिजे।

आपला मित्र पैशाने गरीब असला तरी चालेल पण तो विचारांनी गरीब नसावा।

आता हे जे लोकं बलात्कार, चोऱ्या करतात हे नेहमी कोणत्यातरी वाईट विचारांच्या माणसाच्या संपर्कात येऊन स्वतःच्या विचारांना गढूळ करण्याचे काम करीत असतात व एक दिवस त्यांना आपल्या कर्माची फळे भोगावीचं लागतात,  त्यांच्या आईवडीलांना त्यांच्यामुळे खाली बघायची वेळ येते, म्हणून कधीही चुकीच्या माणसाशी संगत करण्यापेक्षा एकटे राहालेलं कधीही बरं।

आई नेहमी सांगत असायची की चुकीच्या लोकांशी कधीही संबंध ठेवू नये पण आपण नेहमी अश्या छोट्या पण महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करीत असतो,  

एकदा असेच एका रिशेप्शनला गेलो असताना माझ्या एका दूरच्या मित्राला पोलिसांनी पकडले आहे असे समजले, ऐकून खुप खराब वाटले तेव्हा भरपूर रात्र झाली होती त्यामुळे सकाळी उठून त्याला भेटण्यासाठी गेलो तर तेथील पोलिस कॉन्स्टेबल मला कमी जास्त बोलायला लागला,   

खरं तर चांगल्या ठिकाणी नोकरीत असल्यामुळे मला सगळीकडे भरपूर मानं मिळत होता पण अचानक त्या कान्स्टेबल ने केलेला अपमान बघून थोडं वाईट वाटले , त्याचे सिनियर लोकं ओळखीचे होते त्याची फोन करून चांगलीच वाट लावावी असे वाटले पण मी हा विचार केला की तो माझ्याशी असे का वागला असेल?   तर त्याचे कारण हेच होते की मी एका गुन्हेगाराला भेटायला गेलो होतो  , जो मित्र आत होता त्याने काहीतरी बेकायदेशीर काम केल्यामुळे त्याला आत टाकलेले होते,  त्यामुळे गुन्हेगाराला भेटायला आलेला व्यक्ती हा गुन्हेगारचं असेल म्हणून तो माझ्याशी असे वागला असेल त्यात त्या बिचाऱ्या काँन्स्टेबल ची काय चुक?  तो तर त्याच्या ठिकाणी बरोबरच होता ना।

आणि मला पण ते माहिती नव्हतं कि समोरच्या व्यक्तीने किती मोठा गुन्हा केला ते? मला वाटलं काही कौटुंबिक छोटी -मोठी गोष्ट असेल,  

त्या गोष्टीपासून मी त्या व्यक्तीसोबत माझा काहीही संबंध ठेवलेला नाही कारण जर एखादी व्यक्ती त्याच्या चुकीच्या वागण्यामुळे आपले नुकसान करीत असेल ,त्यांच्यामुळे आपल्याला खाली बघायची वेळ येत असेल तर असे लोक फक्त आपल्याला नुकसानच पोहोचवु शकतात।  मी असं म्हणतं नाही की पोलीस स्टेशन ला जाणे चुकीचे आहे,  तिथे नक्की जावे पण एकतर एखादी चांगले काम करून जावे किंवा चांगले काम करण्यासाठी जावे।

तर वाईट माणसाची संगत असेल तर कोणीपण आपला कुठेही अपमान करू शकतो।

एकदा भगवान बुद्ध एकदा एका गावात भिक्षा मागण्यासाठी गेले होते, त्यांच्यासोबत त्यांचे काही शिष्यही होते ,त्यापैकी एक खूप आकर्षक व दिसायला सुंदर होता त्यामुळे त्या गावात राहणाऱ्या एका वेश्येची नजर त्या शिष्यावर गेली,  ती सतत त्याच्या मागेमागे करत होती व त्याच्याशी बोलण्याचा, त्याला भेठण्याचा प्रयत्न करित होती पण ते काही शक्य झाले नाही।

म्हणून तिने आपल्या शिष्याला माझ्याकडे रात्री जेवण करायला पाठवावे अशी बुद्धाकडे मागणी केली, व बुद्धाने ती मान्य ही केली।

बाकीचे शिष्य बुद्धाला सांगत होते कि,  ती महिला वेश्या असल्यामुळे तिच्याकडे त्या शिष्याला पाठवू नये पण भगवान बुद्धांनी तिच्याकडे त्या शिष्याला पाठविले।

तो शिष्य गेल्यानंतर त्याला त्या महिलेने वेगवेगळे पदार्थ खाऊ घातले व रात्रभर तो शिष्य तिच्याकडेच झोपला।  आपला मित्र हा संन्यासी असून सुद्धा मोहात पडला असे बाकिच्या त्याच्या मित्रांना वाटत होते। व आता तो कधीही परतणार नाही असे विचार करून रात्र गेली।

सकाळ होताच बुद्धांकडे एक महिला भिक्खु व पुरुष भिक्खु भेटायला आले,  ते दोघं दुसरेतिसरे कोणी नसून तो शिष्य व ती वेश्या होती।

लोकांनी असा विचार केला कि त्या वेश्येच्या नादाला लागून तो शिष्य बिघडणार पण त्या शिष्याच्या नादाला लागून ती एक मार्ग विसरलेली स्त्री सत्याच्या वाटेवर आली ,आपण आपला स्वाभिमान गमवलेला आहे याची तिला जाणीव झाली।

तर सांगायचे तात्पर्य एवढेच कि चांगल्या माणसाच्या संगतीत येऊन  एखादा भटकलेला माणूस जर त्याची सुधरण्याची इच्छा असेल व त्याला सत्याची जाणीव झाली असेल तर तोही सज्जन बनू शकतो।

ज्याप्रमाणे परीसाला स्पर्श केल्याने लोखंडाचे सोने होते त्याचप्रमाणे चांगल्या माणसाचे सानिध्य आपल्या विचारांवर परिणाम करणारे असते।

सहवास किंवा सानिध्य या गोष्टी मानवी जीवनाच्या विकासासाठी खुपच महत्वाच्या आहेत

माझ्या आफिसमध्ये एक आफिस बाँय होता त्याचे लग्न झाले होते व त्याला दोन मुले होती ,तो रोज दारू पिऊन बायकोला शिवीगाळ करायचा व मारायचा,  आफिस मधल्या साहेब लोकांचा राग घरी जाऊन बायकोवर काढायचा,  त्याचे आपल्या मुलांकडे व त्यांच्या शिक्षणाकडे अजिबात लक्ष नव्हते पण एक दिवस तो अचानक चेंज झाला,  त्याने दारू सोडली व बायकोशी वाद करणे बंद केले व कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी काहीतरी अतिरिक्त व्यवसाय करण्याचा तो प्रयत्न करू लागला,  कसेपण आपले आर्थिक उत्पन्न वाढावे व आपली बायको नि मुले सुखी राहावी असे त्याला वाटु लागले मग हा असा बदल अचानक कसा झाला असेल??

तर तो पहिले एका बदमाश लोकांच्या वस्तीत राहायला होता तेव्हा तो तेथील आजूबाजूचे लोकं आपल्या घरच्यांशी जसे वागत होते त्याचाच परिणाम होऊन तो पण तसेच वागत होता पण जेव्हा त्याने दुसरीकडे चांगल्या ठिकाणी किरायाने घर घेतले व तेथील लोकांचे राहणीमान, ते आपल्या परिवारातील लोकांशी कसे वागतात ह्या सगळ्या गोष्टी त्याने बघितल्या व त्यामुळे तो ही आपल्या परिवारावर प्रेम करू लागला, म्हणजे आपल्या आजुबाजूला राहणारे लोकं हे आपल्या जीवनावर व आपल्या वागणूकीवर परिणाम करत असतात

मुले आपल्या आयुष्यात जेव्हा कर्म करण्याचा काळ असतो तेव्हा आपली महत्त्वाची वेळ ही टाइमपास करण्यात किंवा नको ती कामे करण्यात घालवितात व त्या चुकांचे परिणाम आयुष्यभर भोगतात।   खरतरं जी माणसे 18 ते 25 वर्षात चांगली मेहनत व आपल्या करियर कडे लक्ष देतात ती आपल्या आयुष्यात खुप समोर जातात व मस्त जीवन जगतात पण जे लोक या वेळेत चुकीच्या लोकांच्या नादी लागतात त्यांचे समोरचे आयुष्य हे खूप कठीण होऊन जाते,  वय निघून गेल्यावर जेव्हा चुका कळतात  तेव्हा काहीच फायदा नसतो।

नोकरी नसते, पैसा नसतो, अश्या लोकांना कोणी लग्नासाठी मुलगी देत नाही व उमेदीच्या काळात केलेल्या दुर्लक्षामुळे त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊन जाते।

मित्रमैत्रिणी ठेवणे काही वाईट गोष्ट नाही पण आपल्याला आपले  व्यक्तीत्व कसे बनवायचे आहे?  त्यानुसारच आपले मित्र असायला हवेत नाहीतर बनायचं काही वेगळंच असतं आणि बनतो काही वेगळंच।

आपण कधी हा विचार केला आहे का एवढ्या मोठ्या द्वारका नगरीचा राजा श्रीकृष्ण त्यांचा अत्यंत जिवलग मित्र हा एक गरीब सुदामा होता याचे कारण काय?  राजाचा मित्र नेहमी राजा किंवा राजपुत्र किंवा कोणी मोठा माणूसच असतो पण असे काय कारण असावे कि एखाद्या खुप मोठ्या माणसाचा मित्र हा एक खुप गरीब माणूस असेल?  

तर याचे उत्तर हेच आहे की कोणत्याही माणसाला पैशाने तोलणारा व्यक्ती हा स्वार्थी माणूस असतो जो माणूस तुमच्याजवळ सर्वकाही असताना जसे वागत असतो तसाच व्यवहार जेव्हा तो तुमच्याकडे काही नसताना ठेवेल तर तोच खरा आपला शुभचिंतक असतो।

या  समाजात असे बरेच लोकं बघायला मिळतात जे आपले कपडे, आपले गाडी किंवा आपले पैसे बघुन आपल्याशी संबंध जोडतात व जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा त्यांचा पत्ताच नसतो,  तर अश्या लोकांशी संबंध ठेवून काय उपयोग आहे काय?  आयुष्यात तीच व्यक्ती नेहमी समोर जाते जिला माणसे ओळखता येतात,  नाहीतर इतिहासात अशी बरीच लोकं आहेत ज्यांचा जवळच्याच लोकांनी घात केलेला आहे ।

म्हणून जो कठीण व संकटाच्या समयी कुठल्याही स्वार्थाशिवाय आपल्या कामात येईल तोच खरा मित्र व अश्याचं व्यक्तीशी मैत्री करून हे छोटेसे आयुष्य सार्थकी लागेल।।।।

शेवटी

नका करू असंगाशी संग।

येऊन जाल तंग।।

प्रगती होईल भंग।।।

दुरूनचं करावा साष्टांग।।।।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: