साहित्यातील तीन अष्टपैलू रत्ने

१) विजय तेंडुलकर:-

      विजय तेंडुलकर म्हणजे जवळपास एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्वच म्हणावं लागेल. त्यांच भारतीय साहित्यात मोलाच योगदान राहिलं आहे. एका नाटककारापासून ते पटकथालेखक, पत्रकार व त्याचसोबत सामाजिक लेखनही त्यांनी केलेल आहे. महाराष्ट्रातील कोल्हापूर या ठिकाणी त्यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांनी चक्क पहिली कथा लिहीली. नाटक पाहत वाढलेल्या तेंडुलकरांनी वयाच्या अवघ्या ११ व्या वर्षी आपलं पहिलं नाटक लिहिलं.
            विजय तेंडुलकरांची प्रसिद्ध नाटक म्हणजे, “शांतता! कोर्ट चालू आहे”, “ढाई पन्ने”, “घासीराम कोतवाल” आणि “सखाराम बाइंडर”. यातील सखाराम बाइंडर हे विशेष गाजलेल नाटक म्हणावं लागेल. तेंडुलकरांची बरीच नाटके ही हिंदी भाषेतही अनुवादित केली गेली. विजय तेंडुलकर म्हणजे त्या काळातले निर्भिड लेखक, त्यांनी नेहमीच नवीन काहीतरी समाजाला देण्याच्या उद्देशाने नाटके लिहीली. बऱ्याचदा त्यांना लोकांच्या रोषालाही सामोर जाव लागलं. खऱ्या अर्थाने विजय तेंडुलकरांनी नाटकाच्या प्रभावी माध्यमातून प्रेक्षकांवर एक वेगळ्याच छाप सोडली. त्यांच्या चित्रपट पटकथांनाही मोलाच स्थान होतं, त्यांना यात राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला. साल १९८४ मधे त्यांना पद्मभूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
           विजय तेंडुलकरांच्या शारदा या नाटकाविषयी काही बाब पाहुया ती अशी, शारदा ही एका गरीब भटभिक्षुकाची मुलगी – बहुधा १२-१५ वर्षांची असावी. तिचे वडील तिला पैसे घेऊन एका ७५ वर्षांच्या म्हातार्‍याला लग्नात देण्याचा बेत आखतात. हे शारदेला नको असते. तरुण तडफदार नायक पटवून, भांडून हे लग्न मोडण्याचा प्रयत्न करतो. सर्व फोल ठरतात. शेवटच्या अंकात लग्न होत असता-असता नायकाला कळते की हा सगोत्र विवाह आहे. लग्नमंडपात हजर होऊन तो लग्न मोडवतो (कारण लग्नात पौरोहित्य करणारा भट सगोत्र विवाह सिद्ध करण्यास नकार देतो.) अगदी शेवटच्या प्रवेशात आयुष्यातून उठलेली शारदा नदीवर जीव द्यायला जात आहे, आणि नायक तिला तसे करण्यापासून परावृत्त करतो.  या नाटकाचा मुळ हेतू पाहावयाचा झाल्यास हेच समोर येत की, त्या काळात अशी काही गरीब मुलींची लग्न ही काही पैशांकरिता कोणासोबततरी लावून दिली जायची जे की, फार चुकीच आहे. या घटनेवर कटाक्षाने लिखाण करूनदेखील तत्कालीन जनतेच्या रोषाला या नाटकाला सामोर जावं लागलं. याच मुळ कारण म्हणजे, पाहणाऱ्या रसिकांना एकत्र सत्यतेची जाण नसावी अथवा त्यांच्यात समाजात घडत असलेलं सत्य पचविण्याची धमक नसावी. तरीदेखील विजय तेंडुलकरांनी मात्र आपल्या नाटकांद्वारे समाजातल्या विक्षुब्ध घटनांवर टिका करून लिहणं सोडलं नाही, हे विशेष मानाव लागेल. लेखक समाज घडवितो या उक्तीप्रमाणे त्यांनी कदाचित वागायच ठरवलं असेलही.
                 “सखाराम बाइंडर” हे नाटक मला समाजातल्या समस्येबाबत प्रातिनिधीक वगैरे वाटत नाही. ते माणसाच्या मनोव्यापारावर प्रकाश टाकणारे, त्याचे सखोल वर्णन करणारे आहे असेच वाटते. समाजातल्या एखाद्या समस्येबद्दल उहापोह करणारे, जागृती आणण्यास मदत करणारे असे नाटक मला प्रातिनिधिक, रूढार्थाने ‘सामाजिक’ वाटते. तसे पाहिले तर लेखक जे लिहितो ते बहुतांश सर्वच सामाजीक असते कारण तो समाजातच असतो. पण प्रत्येक लेखन समाजाचे प्रतिबिंब पाडून काही शिकवण देणारे नसते त्यामुळे ते सामाजिक या सदरात घालावे असे मला वाटत नाही. नाटकताला सखाराम विकृत आहे असे वाटेल पण तो त्याचा व्यक्तीविशेष आहे. तेंडुलकरांना तो तसा मांडावा असे वाटल्याने तो तसा असेल. एक कथा या पलीकडे मला ते नाटक फार खोलवरचा सामाजिक आशाय कवेत घेणारे वाटले नाही. याचा अर्थ ते उथळ वाटले असा खचितच नाही. माणसाच्या मनोरचनेचे चित्रण करणारे, अधिकार, अगतीकता, व्यवहार या काही बाबींबाबत माणसे कसे वागू शकतात याचे चित्रण करणारे नाटक आहे.
नाटकातल्या अगतिक बाईचे मुंगळ्याशी आणि खिडकी बाहेरच्या कावळ्याशी असलेले संवाद हा मला त्या नाटकातला अतीशय उत्तम भाग वाटला. त्या स्थितीतल्या माणसाच्या मनोव्यवहाराचे उत्तम प्रकटीकरण तेंडूलकरांनी केले आहे असे मला वाटले. असे वेडगळ वाटणारे संवाद-प्रवेश चपखल बसवणे सोपे नाही असे मला वाटते. बाकी खरचं सांगायच तर विजय तेंडुलकरांची किमया दैदीप्यमान आहे, यात वाद नाही.


२) आर. के. नारायण :-

             आर. के. नारायण यांच भारताच्या इंग्रजी साहित्यामधे कादंबरी व कथानक यांमधे विशेष योगदान राहिलं आहे. माणसाच्या वेगवेगळ्या छटांना विविध स्तरांवर व्यक्त करण्यात कुशाग्र बुद्धिमत्तेने त्यांनी भुमिका चोखपणे बजावली आहे. आर. के मुळचे मद्रास येथील. साहित्य अकादमी व पद्म विभूषण ह्या दोन्ही पुरस्कारांनी ते सन्मानित केले गेले. आर के यांनी शिक्षक व त्याचसोबत पत्रकाराचीदेखील भुमिका काही दिवस बजावणं पसंत केलं. आर. के यांच्या मुळत: काल्पनिक रचनांना भरगच्च प्रेम मिळाले आहे.
                 “मालगुडी” हे एक काल्पनिक शहर मानून त्यांनी बऱ्याचश्या रचना त्याभोवती रचल्या. “स्वामी और उसके दोस्त” या कादंबरीतून त्यांनी स्वामी या विनोदी पात्राची अजब पध्दतीने रेखाटनी केल्याची पहायला मिळते. “स्तानक” ही प्रेमकथादेखील तत्कालीन सामाजिक घटकांशी जुळती ठेवून विशिष्ट साच्यात त्यांनी बसवली होती. आर. के. नारायण यांच्या मुळात तीन कादंबर्‍यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. यात समावेश होतो तो, “द फायनेंशियल एक्सपर्ट”, “गाईड” व “मालगुडी का आदमखोर” यांचा. भारताच्या इंग्रजी साहित्यात आजही आर. के. यांना बहुआयामी व प्रगल्भ लेखक म्हणून संबोधल जातं. आजही त्यांच्या साहित्याचा दर्जा टिकून आहे, त्यांच्या लिखाणाबद्दल नेहमीच प्रत्येकाच्या मनात एक वेगळच कुतूहल राहिलेलं आहे.
            नारायण यांनी आपल्या सामी आणि फ्रेंड या कादंबरीचे हस्तलिखित ऑक्सफर्ड मधील एका मित्राला पाठवले या मित्राने ते हस्तलिखित ग्रॅहम ग्रीन याना दाखवले. ग्रॅहम ग्रीनने ते लिखाण आपल्या प्रकाशकाला प्रकाशित करण्याची शिफारस केली आणि १९३५ साली ही कादंबरी प्रसिद्ध झाली . ग्रॅहम ग्रीन यांनी नारायण याना स्वतःचे नाव कमी शब्दात करण्याचा सल्ला दिला जेणेकरून इंग्लिश भाषिकांमध्ये ते लवकर माहित होतील. ही कादंबरी अर्ध आत्मचरित्र होती आणि त्यांच्या लहानपणीच्या घटनांवर आधारित होती. कादंबरीचे अवलोकन खूप प्रसिद्ध झाले परंतु त्याप्रमाणात त्याची विक्री झाली नाही. नारायण यांची दुसरी कादंबरी द बॅचलर ऑफ आर्टस् (१९३७) ही त्यांच्या महाविद्यालयीन अनुभवावर आधारित होती. ती कादंबरी वेगवेगळ्या प्रकाशकांनी प्रकाशित केली. पुन्हा एकदा ग्रॅहम ग्रीन यांनीच प्रकाशनाची शिफारस केली. नारायण यांची तिसरी कादंबरी द डार्क रूम (१९३८) मध्ये घरगुती विसंवादावरती आधारित होती. या मध्ये जुलमी पुरुष आणि शोषित स्त्रीचे वर्णन केले आहे आणि ती कादंबरी आणखी एका प्रकाशकाने प्रकाशीत केली. या कादंबरीला देखील चांगले रिव्हिवज मिळाले. १९३७ मध्ये नारायण यांच्या वडिलांचा मृत्यू झाला व नारायण यांची कमाई काहीच नसल्यामुळे त्यांना सक्तीने मेसूर सरकारकडून कमिशन घ्यावे लागले. नारायण यांनी सुरवातीच्या तीन कादंबरीमध्ये काही सामाजिक समस्यावर प्रकाश टाकला. पहिल्या पुस्तकामध्ये नारायण यांनी विद्यार्थीदशेवर व त्यांना वर्गामध्ये होणाऱ्या शिक्षेवर प्रकाश टाकला. हिंदू विवाहामध्ये लग्नपत्रिका जुळण्याची प्रथेवर दुसऱ्या पुस्तकामध्ये प्रकाश टाकला आणि तिसऱ्या कादंबरीमध्ये त्यांनी नवरा बायको यांच्यामधील संबंधावर लिखाण केले.
                १९३५ साली नारायण यांनी मालगुडी नावाच्या एका काल्पनिक गावाला केंद्रस्थानी असल्याची कल्पना करुन स्वामी ॲन्ड फ्रेन्ड्‌स या नावाची आपली पहिली कथामालिका लिहिली. त्यावेळी त्यांचे लिखाण भारतात कोणाच्याही पसंतीस उतरले नाही. या गोष्टी वाचून लेखक ग्रॅहॅम ग्रीन यांना मात्र या कथांमध्ये त्यांचे नवीन मित्र भेटल्यासारखे वाटले. त्यांनी पुढाकार घेऊन नारायण यांची ही कथामालिका छापण्यात रस घेतला आणि हे पुस्तक अतिशय गाजले. त्यानंतर नारायण यांनी एका पाठोपाठ एक सरस गोष्टी लिहून काढल्या. त्यांच्या बऱ्याच कथा मालगुडी नावाच्या गावाभोवती घडतात. या गोष्टी वाचतांना वाचक त्यात हरवून जातात. हे गाव पूर्णपणे काल्पनिक आहे यावर अनेकांचा विश्वास बसत नाही, इतके वास्तववादी चित्रण नारायण यांनी आपल्या कथांमधून उभे केले आहे. या गावातीलच एक गोष्ट ‘दि गाईड’ यावर गाईड नावाचा हिन्दी चित्रपट निघाला. दि गाईडचे मराठी रूपांतर श्री.ज. जोशी यांनी केले आहे. आर. के. नारायण यांच्या मिस्टर संपत आणि दि फायनान्शियल एक्सपर्ट या पुस्तकांच्या आधारेही चित्रपट निघाले आहेत. शिवाय त्यांच्या मालगुडी डेज वर आधारित एक दूरदर्शन मालिकाही तयार करण्यात आली होती.

साधी लिखाणशैली आणि हलक्या-फुलक्या विनोदामुळे नारायण यांची तुलना प्रसिद्ध रशियन लेखक आंतोन चेखव यांच्याशी केली जाते. त्यांचे लिखाण जगातल्या अनेक भाषांमध्ये भाषांतरित झाले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

३) हरिवंशराय बच्चन:-
हरिवंशराय बच्चन हे हिंदी साहित्यातील उत्कृष्ट कवी व लेखक होते. “मधुशाला” ही आजवरची त्यांची अफाट प्रसिद्ध अशी रचना. अलाहाबाद या ठिकाणी जन्म घेतलेल्या हरिवंशराय बच्चन यांनी इंग्रजी शिक्षक म्हणून भुमिका निभावली. भारत सरकारच्या तत्कालीन विदेश मंत्रालयातही त्यांनी काम पाहिल. उर्दू व हिंदी या भाषात पारंगत होऊन नंतर इंग्रजी साहित्यामधेही पी.एच.डी प्राप्त केली. “यीटस” हा त्यांच्या आवडीचा लेखक. त्यानंतर हरिवंशराय यांचा विवाह एका पंबाजी मुलीसोबत झाला जी गायनात त्याकाळी तरबेज होती.
           “तेरा हार”, “मधुशाला”, “मधुबाला”, “निशा निमंत्रण” ही त्यांच्या गाजलेली कवितासंग्रहांची नावे. हरिवंशराय बच्चन यांनी त्यांच आत्मचरित्र कथन हे चार विविध संग्रहातून मांडल आहे. त्यात समावेश होतो तो, ” क्या भुलूं क्या याद करूं?”, “नीड का निर्माण फिर”, “बसेरे से दूर” आणि दशद्वार से सोपन तक” या चार पुस्तकांचा. “दो चट्टानें” या हिंदी काव्य करिता साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आला. भारत सरकारकडून पद्म भूषण या गौरवशाली पुरस्कारानेही त्यांना सन्मानित केलं गेलं. हरिवंशराय बच्चन यांचा कवितांवरील प्रगाढ अभ्यास पाहून बऱ्याच व्यक्तिंनी नंतर त्यांच्यावर आधारित पुस्तकेदेखील लिहिली आहेत.

By किरण पवार

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: