बायको देता का बायको?

छान मांडणी आणि सद्यस्थिथीवर अचूक भाष्य करणारा गावरान मेवा असा हा चित्रपट आहे, बायको देता का बायको?

तुम्हाला बायको हवीये का हो? अहो वय झालयं, सरकारी नोकऱ्याच उपलब्ध नाहीत, आम्ही शेतकरी ना आम्हाला का कोण पोरं देईल? अहो नाही असं काही देईल की कोणितरी, एखादा महान असेलच इथे. तुम्हाला वाचताना वाटेल हे असं काय लिहतोय हा पण मुळात ज्याबद्दल लिहतोयं तो विषयच काहीसा एका गांभिर्याने विचार करायला लावणारा आहे.

महाराष्ट्र आज भरपूर पुरोगामी म्हणून मिरवतो आपण आजपण मुळात काही ठिकाणी प्रचंड संस्कारीत आणि परखड वागून आपण चुका करून बसतो. बऱ्याच वेळा काही चुका वेळेच्या पलीकडे गेल्या की त्यांच तिथे समाधानकारक उत्तर नाहीच भेटतं, शेवटी आयुष्य कुणासाठी जखडून वा थांबून ठेवण्यासारखं नाहीच आहे मुळी.

तर असाच एक भन्नाट आशयघन मराठी सिनेमा काल दि. २१ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीस उतरला आहे. नाव आहे, “बायको देता काय बायको?” तुम्हाला विचित्र वाटू शकतं पण आज महाराष्ट्रातल्या नी जास्तकरून मराठवाडा, विदर्भ या भागातील गावोगावांची जी अवस्था आहे ती म्हणजे, लग्नासाठी मुली मिळणं खूपच अवघड होऊन बसलयं. “बायको देता बायको?” याचं चित्रीकरण उत्तमरित्या झालेलं आहे. शिवाय यातली गाणीदेखील म्युझिक आणि शब्दांच्या वजनात बऱ्यापैकी पसंतीस उतरतात. या चित्रपटात ज्येष्ठ गीतगायक सुरेश वाडकर यांनी एक अप्रतिम गीत गायलं आहे. सुरेश वाडकरांचा आवाज मनाला आर्त साद घालतो. गाण्याच्या एकूनच नृत्याच्या बाबतीत जराशी मात खाल्ली आहे, हे नक्की. पण मराठीत सध्या नवनवीन चित्रपटांमधे बरेच प्रयोग होतायेत जे मराठीचा दर्जा नक्कीच अधिक उंचावर नेत आहेत.
           

    या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन तरूण असणाऱ्या “सुरेश साहेबराव थांग” याने केलं आहे. या चित्रपटाच्या कथेत त्यांच्या पात्राभोवती जरी इतर कहाणी फिरत असली तरी एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे ती म्हणजे, सुरेश थांग याने दिग्दर्शन उत्कृष्टरित्या केलं आहे. पण कलाकार म्हणून नवख्या चेहऱ्याला अजून भरपूर मेहनत घ्यावी लागणार आहे. करिअरच्या सुरूवातीच्या टप्प्यात जर त्यांनी आपला फोकस एक दिग्दर्शक म्हणून ठेवला तर नक्कीच उद्या चालून ते मराठी सिनेसृष्टीत चांगल नाव कमावल्याशिवाय राहणार नाहीत. सुनील गोडबोले यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर एकहाती आख्खा सिनेमाच आपलासा करून घेतला असं आपल्याला भासत राहतं. किशोर ढमाले सोबतच नवीन अभिलाषा, श्वेता कुलकर्णी, आरती तांबे यांनी पदार्पणात उत्तम अभिनय पडद्यावर साकारला आहे. मराठीतला महत्वाचा ओळखीचा चेहरा म्हणजे सिद्धेश्वर झाडबुके यांची भुमिका थोड्या थोड्या क्षणांमधेच असली तरी ती पुरेशी उतरलेली आहे, हे नक्की. सुनील गोडबोले यांनी तर सिनेमाच्या आॅनस्क्रीन अक्षरश: उत्कृष्ट प्रदर्शन दिलं आहे.

या चित्रपटाच्या कथानकात एक मुलगा आहे ज्याचं नाव संदेश आहे. तो गावच्या प्रतिष्ठीत व्यक्तीचा मुलगा आहे. अर्थात त्याचे वडील हे सरपंच आहेत. गावातले पोरं सहसा पारावर जास्त आणि इतर ठिकाणी कमी ही आजची सद्यस्थिती इथे दर्शविण्यात आली आहे. या कथेच्या मध्यंतरापर्यंत जी गम्मत लग्नाच्या केवळ विविध चर्चांवरून व काही स्थळं पाहण्यावरून चारत राहते. संदेश आणि त्याचे मित्र त्यातील एका मित्राला एका मुलीवर प्रेम झालयं; अर्थातच त्या मुलीनेही त्या मुलाला आपला गावाच्या नकळत इशारा देणं चालू ठेवलयं. ती जोडी आहे किरण आणि भारती या दोघांची. तसं म्हणायला गेलं तर गावातलं प्रेमप्रकरण सोप्पही आहे आणि कठीणही. कठीण यासाठी की गावची करामत अशी असते, “केसभर गजरा अन गावभर नजरा”. थोडक्यात काय तर एखाद्या गोष्टीची जरा जरी चुणूक गावातल्या एखाद्या व्यक्तीला लागली तरी ती गोष्ट पुढे फाॅरवर्ड झाल्याशिवाय राहतं नाही. गावातल्या एका दुकानातील मुलीवर संदेशच प्रेम आहे. पण ती मुलगी काही कारणास्तव त्याची टाळाटाळ करत राहते. अर्थात तिला अंती काही झालं तरी पैसेवाल्या आणि नोकरीला असलेल्या मुलाशी लग्न करायचं आहे. हीच व्यथा गावात विविध घरात आहे, मुलीच्या लग्नासाठी स्थळ बघताना आज कुणीही मुलाचं कॅरॅक्टर तपासायची तसदी न घेताना दिसतोयं. इंजीनिअर झालायं म्हणजे थोडी ना व्यसणी असेल, नी गावात मेहनतीने शेती करतोय तर पोरगा १००% वाया गेलेला असणार हा निष्कर्ष आज समाज का ठरवतो? मुळातच समाजाचं आज काहीतरी चुकतयं. आज गावोगावात बऱ्यापैकी अशी परिस्थिती आहे की, बऱ्याच जणांना नोकरी नाहीये काहींना स्वखुशीने शेतीत रस आहे. परंतु अशांना जेव्हा लग्नासाठी स्थळ येतं तेव्हा नेहमीच आधी ऐपत का तपासली जाते? याच उत्तर कोणीच देऊ शकत नाही. परंतु उत्तर नसलं तरी यावर तोडगा असू शकतो असं काहीसं हा चित्रपट पुढे घडणाऱ्या घडामोडींमधून सांगून जातो.
        

    सुनील गोडबोले यांचा “नारायणराव” शेवटपर्यंत प्रेक्षकांना त्यांच्या लग्नाच्या बाबतीत असणाऱ्या टोचून टिका आणि सडेतोड एखाद्याची खैर घेणाऱ्या जरासा गोंधळात टाकून सोडतो. नारायण राव हा संदेशचे वडील जे सरपंच आहेत त्यांचा मित्र आहे. संदेशला सुरूवातीपासूनच जरा नारायणरावची चीड आहे पण नंतर त्याला त्यांच्या रागापाठचा सार कळून चुकतो.

दारू पिलेला नवरा भेटलाच तर बाईच्या नशीबाला काय भोग येतात याची एक पायरी पुढे जाऊन गोष्ट यात मांडली आहे. स्त्री जातीला मुळातच एकतर संशयाच्या नजरेतून पाहण्याची जणू काही या समाजाला लागलेली वाईट दृष्टीचं आहे. संदेश ची बहिण पूजा हीचं जोवर लग्न जमत नाही तोवर संदेशचं लग्न होतं नसतं, परंतु संदेश कायम मित्रांसोबत कोणत्या ना कोणत्या गोत्यात फसल्याने वडिलांना दोनदा पोलीस स्टेशनची पायरी चढायला लागते. मुलाचं लग्न केल तरच मुलगा जरा जबाबदाऱ्या घ्यायला शिकेन हा समज झालेले सरपंच संदेशसाठी स्थळं पाहायला सुरूवात करतात, पण मुलगा पुढे शेतीचं करणार असल्याचं सांगताच त्याला भरपूर नकार मिळायला लागतात. इकडे संदेशचा मित्र पुण्याला असणाऱ्या त्याच्या आत्तेबहिणीसोबत संदेशचं प्रेम जडतं. मुळात या सगळ्यात पुण्याला असलेला मित्र जरा आलिप्त असतो पण एका अंतीम क्षणाला जेव्हा सरपंच आपल्या मुलीचं म्हणजे पुजाचं लग्न जमवत असतात तिथे हा मित्र आलेला असतो. नारायणराव ते लग्न मोडतात. ते लग्न मोडल्याचा राग सरपंचांना आल्यावर नारायण राव सरपंचांना त्यांनी केलेल्या चुकीची आठवण करून देतात. डोळ्यासमोर जी मुलं वाढली, लहानाची मोठी झाली, शिकली, काहीतरी पोटापाण्यापुरती कमवू लागली, अशी पोरं सोडून का शहरातले नोकऱ्या करणारे दारू पिऊन हुशारक्या मारणारे जावई पाहिजेत हा प्रश्न खनखनीत नारायण राव जेव्हा मांडतात तेव्हा नक्कीच गावातल्या प्रेक्षकांना त्यांना पाहताना गहिवरल्याशिवाय राहतं नाही. या चित्रपटाच्या कथेला आणखी दर्जेदार संवादातून खुलवता आलं असतं असं म्हणता येईल, पण संवाद गावाकडच्या शैलीत असल्याने ती कमतरता जाणवली नाही. अर्थातचं हा चित्रपट जर आज प्रेक्षक म्हणून तुम्ही मिस कराल तर नक्कीच एका योग्य वेळी योग्य आशयघन चित्रपटाला मुकाल हे नक्की. आणि मुळातचं काही खास गोष्टी जसं की, गावातल्या लावालाव्या करणारी मंडळी किंवा गावातल्या इतर गमतीजमती पाहण्यासारख्या आहेत.

कथेसाठी गुणांकन:- 3.5/5
अभिनयासाठी गुणांकन:- 3/5
दिग्दर्शन आणि मांडणी:- 3/5
एकून गुणांकन:- 3.5/5

By किरण पवार (चित्रपट समीक्षक)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: