# लग्न तुझं-माझं !!

# लग्न तुझं-माझं.

         माझ्या लग्नाची लगबग एव्हाना सुरू झाली होती आणि नुकतीच झी मराठीवर “नकटीच्या लग्नाला यायचं हं” ही मालिकादेखील निव्वळ योगायोगाने तेव्हाच सुरू झाली होती. मी निवांत होणारा पतीदेव कसा असेल याची प्रतिमा मनात विणत असतानाच माझा छोटा भाऊ विनोद माझ्या खोलीत आला. आल्याआल्या त्याने मला पहिला धक्काच काहीसा असा दिला की,
विनोद:- ताई अजून तुझी अंघोळ नाही झाली…
मी:- नाही. का रे?
विनोद:- आता मी होणाऱ्या जिजूंना कितीवेळ असं अजून बसवून ठेवणारं? फार फार तर आई बाबा बोलण्यात अर्धा तास घालवू शकतील. त्यात माझे पंधरा मिनिटे पकड. आणि अजून एक तास त्यांचा कसा बरं घालवायचा?
मी:- ए… काय आं…? म्हणजे तुला म्हणायचय काय, हां? मी अंघोळ करून फ्रेश व्हायला दोन तास वेळ घेते का रे बावळट?
विनोद:- दोन तासाच जाऊ दे. ज आलेत त्यांच काय?
मी:- अरे बापरे! हे तर विसरलेच मी. त्यांना सांग दिदी आॅफिसला गेलीये.
विनोद:- मगं हा प्लॅन आधी सांगायचास ना तू मला.
मी:- आधी? मग आता काय झालं?
विनोद:- मी म्हटलो, दिदी आवरून येतच असेल. दोन मिनीटात येईल.
मी:- मूर्खा. वाट लावलीस ना चांगलीच माझी. थांब तुझी परीक्षा जवळ आल्यावर तुझ्याकडे बघते.
विनोद:- बघं, हरकत नाही.
            एवढ बोलून तो थेट तिथून निघून गेला. तो गेल्यावर मला एकतर प्रचंड ताण आलेला. माझी तर जणू गळचेपीच झालेली. मनात एक क्षण वाटलं, या मुलांना काही कामधंदे असतात का नाही? मुलगी पहायला जायचयं हे कळतं न कळतं तोवर गाडीला कीक मारून मुलीच्या घराला मार्गस्थ होऊन जातात. छ्छे यार! पण सध्या काय करू? मी स्वत:ला सावरलं आणि तोंडहातपाय स्वच्छ धुवून पटकन सगळ आवरलं आणि थेट खोलीत प्रवेश केला. इंजिअरींगच्या दुसऱ्या वर्षापासून आम्हा मुलींनाही सवय पडून गेली होती की, पाच मिनिटात अंघोळ करून टापटीप कसं व्हायचं. तोच फाॅर्मुला आज कामी आला होता. मी मनात आनंदी भाव आणि चेहऱ्यावर स्मित ठेवतं मोठ्या खोलीत प्रवेश करून पाहिलं आणि…. आणि तिथे कोणीच नव्हतं. मला वाटलं आई बाबा मुलांकडच्यांना घर दाखवत असतील म्हणून मग मी जाउन टिव्हीसमोर मस्तपैकी सोफ्यावर बसले. थोड्या वेळाने बाबा समोरच्या दरवाज्यातून एकटेच आत आले. आणि मला पाहून त्यांनी बोलायला सुरूवात केली.
बाबा:- काय आज खूप खुश दिसतेस? काही स्पेशल?
मी:- ( मनात जरा गोंधळून.) तुम्ही सरप्राईज द्यायचा प्लॅन करताय का? पण ना विनूने सांगितलयं मला सगळं.
बाबा:- तू माझी फिरकी नकोस अं घेऊ या वयात? बरं आज चक्क आमच्या लेकीने साडी घातलीये.
मी:- बाबा मी नाही फिरकी घेतयं. आणि पाहुणे मंडळी आल्यावर साडी घालाविच लागते ना सहसा.
बाबा:- अच्छा, पाहुणे आलेत का घरी? मग ठीकयं.
मी:- आलेत का म्हणजे? तुम्हाला काहीच माहित नाही?
बाबा:- कशाबद्दल?
मी:- म्हणजे मला पहायला कुणीच आलं नाही?
बाबा:- अरे वा! एवढी घाई झालीये तर लग्नाची.
        तेवढ्यात माझ्या मागून येऊन थांबलेला विन्या जोरजोरात हसायला लागला. त्याला हसताना पाहून मला मात्र भरपूर राग आला. विनाकारण मला काही वेळापूर्वी किती ताण दिला यार याने. आता सोडायचचं नाही याला अशा आविर्भावात मी जोरात त्याच्या मागे धावले तर तो थेट स्वयंपाकघरात गेला. आणि आईजवळ जाऊन थांबला. मीही त्याच्या पाठोपाठ तिथेच गेले.
          आत पाहिलं तर आई काहीतरी तळत असल्याचा वास मला आला. तो ओळखीचा होता पण मला लवकर गेस नाही करता आला आणि मी आईच्या जवळ जाऊन तिच्याशी बोलू लागले.
मी:- आई विन्याला सांग ना गं.
आई:- विन्या काय केलसं रे आता? तुला फक्त ताईला लवकर उठव एवढचं बोललेले मी.
विनोद:- आई तेवढचं केलं मी. बाकी आता होणारे तुझे जावई आणि ताईचे मिस्टर यांबाबत मी तरी काहीच बोललो नाही अजून.
मी:- आई, यार तुम्ही सगळे गोलगोल घुमवताय मला. खरं सांगा ना माझ्यासाठी कुठलं स्थळ डोक्यात आहे का तुमच्या?
आई:- अगं डोक्यात नाही. अगदी नजरेसमोर आहे. पण काय आहे ना, त्या पलीकडच्या घरातल्या बाहेरगावाहून परतलेल्या एका तरूण मुलाला “मेरे सामने वाली खिडकी” मधल्या मुलीचा भारी विसरं पडलेला दिसतोयं.
मी:- काय आई तू पण कोड्यात….? अच्छा… म्हणजे अभी आलायं. ( आनंदाच्या स्वरात.)
आई:- हो.
विनोद:- आई काय हो? जावई आहे तो घरचा, त्याच नाव असं घेतात का?
मी:- ए कारट्या गप. आई जावई वगैरे नाही अं, मित्रय तो चांगला माझा. मी आलेच त्याला भेटून.
असं बोलून मी अभीला भेटायला निघाले. मला लहानपणीचा अभी क्षणात आठवला. माझ्यापेक्षाही गोरापान आणि दरवेळी नाकावर राग असलेला. त्याने एकदा लहानपणी एक मोठी गम्मत आणलेली किर्तनात. सर्वांसमक्ष उभा राहूण, मला आत्ता इथेच तो विठ्ठल साक्षात भेटला पाहिजे असा हट्ट घेऊन बसला होता. एकदा तर स्वत:ला कृष्ण समजून करंगळीवर सायकल उचलतो म्हणतं होता. मी त्याच्या घराच्या उंबरठ्यात आले तेवढ्यात लहानपणीचा त्याचा फेमस डायलॉग आठवला. तो नेहमी म्हणायचा, “अगं सोड ना सार भांडण माझं पोट दुखतयं.” त्याच्या प्रत्येक वादात अंती त्याच पोट दुखणार हे ठरलेलं असायचं. आता मी आत पाऊल ठेवलं तेवढ्यात त्याने दाराआडून जोरात माझ्या कानात ओरडून मला “भौ… जाडे….” बोलला. मी लागलीच मागे वळली आणि म्हणाली, “जाडी असेल पण तुझ्या गाडीपेक्षा कमीच आहे रे, एक उडी तुझ्या पाठीवर मारली तर कसं वाटेल आं?”
          ते झाल्यावर दोघे त्यांच्या घरात मोठ्या खोलीत बसलो. काकू आत चहा ठेवायला गेल्या आणि आमच्यातल्या गप्पा सुरू झाल्या.
          अभी:- काय मग, कशी आहेस?
मी:- मी मस्तच, दरवळत राहते ना नेहमी.
अभी:- तुला अजून ते लक्षात आहे, मी बोलायचो किती दरवळत असतेस फुलाच्या सुगंधासारखी.
मी:- तेच काय बऱ्याच गोष्टी लक्षात आहेत, मॅडमला चक्क प्रपोज केलतास तू.
( तो थोडासा लाजला अन् मी हसले.)
अभी:- जाऊदे ना, तू थोडी ना कमी होतीस. इंग्रजी बोलायच्या नादात काय केलेलसं माहितीये मला.
मी:- हां आता थोडं, इंग्रजी फाडफाड करता करता इंग्रजीच मी फाडली होती त्यात काही वादच नाही.
अभी:- सगळ्यात भारी एक वाक्य बोललेलीस, “इफ यू आर नाॅट माईंड, आय विल बी इव्हरीबडीज फाॅरेवर.”
मी:- ए हसू नको यार, माहितीये माईन ला माईंड म्हणले.
अभी:- तेवढंच का? “समबडीज” च्या ऐवजी प्रत्येकाची होईल असं कोण बोलतं. ( अभी जोरात हसला.)
मी:- तुला तो जिन्यातला किस्सा आठवतोयं ?
अभी:- प्लीज सुरूवात होती आं ती इंग्रजी ची. तेवढ चालणार की.
मी:- एक्सक्युज मी व्हेअर इज् द लॅब? आणि पुढे थेट बोललास फीस काय आहे? माझ सोड ज्या मुलीला विचारलसं ती किती हसली असेल.
अभी:- ए काही म्हण आं… पण मजा यायची यार त्यावेळी. मला आठवतयं काॅलेजमधे एक मुलगी प्रत्येक एका वरच्या ट्युनिंगमधे बोलायची काय भौ… काय चाललयं?
मी:- हो ना, फार अल्लड होती. आता खूप बदललीये पण ती.
         अभी:- बरं जाऊदे लग्नाच काय ठरलवलयेसं?
मी:- लग्न, घरच्यांनी घाई लावलीये पण अजून तेवढंं काही नाहीये.
अभी:- अच्छा.
मी:- तुझं काय रे उंडग्या?
अभी:- माझं काय? मला आलीये एक पसंत. बघुयात आता मातोश्रीच काय म्हणणंय?
मी:- अच्छा, निघते मी.
अभी:- अगं…!
         पुढे तो काय बोलला काय नाही, हे न ऐकताच मी निघून आले. माझ्या काळजात कसतरी झालं त्यावेळी. अभीला कोणती दुसरी मुलगी आवडलिये हे मनाला पटवू शकले नाही त्यावेळी मी. मी फार जिव लावत आले होते त्याला पण खरचं त्याला माझं प्रेम एवढी वर्षे लोटली तरी कळलं नसेल का? शेवटी जाऊ द्या म्हणतं मी घरात जाऊन थेट माझ्या खोलीत गेले. मी कपाटातील एक जपून ठेवलेली वही काढली अभी ची होती ती. नटसम्राट मधल्या एका संवादाच विडंबन केल होतं त्यावेळी त्याने त्या पत्रातला मजकूर असा होता,
       To learn or not to learn that is the question….

शिकावं की न शिकावं हा एकच सवालंय…. या धकाधकीच्या मार्गावर घामाच्या अंशाचा गाभा होऊण शिकावं निर्लज्ज बेपर्वाईच्या अपमानान……
               की टाकून द्यावं या शिक्षणाचं ओझं त्या अंथरुणात लाथ खात पडलेल्या दुःखासह इंटिग्रेशनच्या भुलभुलय्या मध्ये….
       आणि करावा सर्व विषयांचा शेवट मॅथ्सचा, विज्ञानाचा, इतिहासाचा आणि भुगोलाचा सुद्धा…
            बोर्डाच्या परीक्षेन जीवनाला असा शिक्का मारावा की नंतर येणाऱ्या-जाणाऱ्यालाही तोंड दाखवायला जागा उरु नये कधीही…..
      पण त्या निकालालाही आम्ही निर्लज्जतेने घेतलं तर… तर
इथंच मेखयं
          नव्या कॉलेजच्या नव्या वर्गात प्रवेश करण्याचा धीर होत नाही म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं गावाकडंल जागेपण……. सहन करतो खालच्या मानेने शिक्षणावर होणारे अंधश्रद्धेचे चमत्कार नागरिकशास्त्राच्या प्रकरणात असलेल्या सत्वांची विटंबना…..
       आणि अखेर निकालाचा धागा घेऊन उभे राहतो खालच्या मानेनं गावाच्याच महाविद्यालयाच्या दाराशी…..
          हे विधात्या तू इतका कठोर का झालास?? एका बाजूला ज्यांना आम्ही पेपर दाखवले ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांनी आम्हाला थोडी विवेकबुद्धी दिली तो तु ही आम्हाला विसरतोस…..
       मग अर्धवटलेल्या त्या ज्ञानाचे निकालपत्र घेऊन हे शिक्षण मंडळा आम्ही ढ पोरांनी कुणाच्या कॉलेजात डोक आपटायचं रे….
कुणाच्या….
         आणि हे वाचत वाचत, हसताना मी केव्हा झोपी गेली माझं मलाच कळलं नाही.

By :- किरण बंडू पवार (लेखक व सिने समीक्षक)

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: