#त्या दोन क्षणिक प्रेमकथा!


#त्या दोन क्षणिक प्रेमकथा!


*१. मी,हैदराबाद आणि ती*
          अगदी दोन वर्षे खालची गोष्ट आहे. मी एका औषध वाटपाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तो कार्यक्रम ऑल इंडिया एक्झिबिशन ग्राउंड हैदराबाद या ठिकाणी आयोजित केला गेला होता. तसा तो दरवर्षी तिथेच असतो. पण या वर्षी मात्र माझ्यासोबत एक खास गोष्ट नकळत घडून गेली. मला एक मुलगी आवडली. हो! मी थेट सर्व भाव प्रकट करणाऱ्यातला आहे. माझ्यापेक्षा कदाचित दोन वर्षांनी लहान होती. एन.सी.सी कॅंडिडेट होती ती. तिचं नाव काय होतं? हे आजवरही शोधतोय मी. ती उभी होती तिथे आलेल्या लोकांचं व्यवस्थापन एका विशिष्ट रांगेमध्ये करण्यात. तिची मैत्रीण तिच्या बाजूला तिच्यासोबत गप्पा मारत होती. थोडा विरंगुळा हवाच असतो, कामाच्या ठिकाणी. तसा त्यांचा चालू होता.
            मी आपला महाराष्ट्रीयन लातूर वरून एकटा गेलेलो. त्यामुळे कुणाचंच बंधन नव्हतं. आणि मी त्या भरात एकटक तिच्याकडे पाहत होतो. दिसायला फार सुंदर नव्हती. रंग जरासा सावळा होता. पण तिच्या चेहऱ्याची छटा मला भारावून गेली होती. मनात खूप वेळ विचार रेंगाळत होता की, जावं आणि तिच्याशी मैत्री करावी. पण हिम्मत होत नव्हती कारण बाजूलाच पोलिसांचा कडक पहारादेखील होता. ते म्हणतात ना, पाऊस पडला की दवाला कारण नाही लागत खुलून यायला. तसं काहीसं झालं आणि ती माझ्यावर लक्ष ठेऊ लागली. दोन क्षणात जसंच तिच्या लक्षात आलं, तिने थेट गालावर खळी पाडली. कोणत्या मुलीला आवडणार नाही, कोणीतरी निरागसं डोळ्यांनी तिच्या सौंदर्याला न्याहाळलेलं. तिला समजून गेलं होतं की, मी तिला पाहतोयं. पुढे दिवसं सरत आला होता, मी औषध घेऊन बाहेर पडून पुन्हा तिला पाहण्याच्या बहाणे ग्राऊंडमधे शिरलो. या सर्वात जरी मी तिच्यात रममाण असलो ना तरी, त्या एनसीसी कॅंडिडेट मुलामुलींच्या तुकडीच्या कामाच मी पुरेपूर कौतुक व आदरही करत होतो. ती दिवसभर काहीच न खाता पिता भर उन्हात उभी होती. तिला आलेला नाष्टा तिने इतक्या सहजपणे कसा काय नाकारला?? याचंच आश्चर्य वाटत होतं मला. पुढे ती तिच्या तुकडीसोबत घरी प्रस्थान करायला बसमधे बसू लागली. बसताना चहू बाजूंना तिने बराचवेळ तिची नजर फिरवली. ठामपणे नाही सांगू शकतं की, ती नजर कोणासाठी होती. पण एवढं मात्र नक्की की, काही क्षणांची आमची ओळखं मरेपर्यंत एकमेकांच्या ह्रदयावर कोरल्या गेली होती.

  *२. मी, औरंगाबाद आणि ती*
           मी औरंगाबाद वरून नुकताच पुण्यासाठी निघालो होतो. त्याकरता मला आधी बाबा पेट्रोल पंप गाठणं गरजेचं होतं. आणि त्याकरता मी एका रिक्षात बसून निघालो. रिक्षा रिकामीच होती. पण पुढे गेल्यानंतर  एक माझ्याच वयातली मुलगी रिक्षात बसली. ती बहुतेक देवगिरी कॉलेजची विद्यार्थिनी असावी असा अंदाज मी तिच्या गणवेशावरून लावला. थोडा रिक्षा पुढे आल्यावर रिक्षावाल्याला कमालीची तहान लागली होती. तो पाणी पिण्यासाठी पाणपोईजवळ उतरला. मग काय? रिक्षात आम्ही दोघेच उरलो होतो. मुलगी बाजूला आहे म्हटल्यावर मी जरा चाचपडतच होतो. मला भीती वाटते असं गृहीत धरा हवं तर. पण खरं आहे ते आहे. माझ्या थरथरत्या नजरेला हेरलं होतं तिने. कदाचित मुलींमध्ये ही शक्ती जन्मजात असते. त्या वातावरणात निर्माण झालेला ऑकवर्डपणा तिला असह्य झाला. आणि तिने पुढाकार घेत बोलायला सुरूवात केली. “आज-काल फुलपाखरं फार कमी झाली आहेत.”, ती म्हणाली. हो ना…! एवढेचं दोन शब्द माझ्या तोंडातून वदल्या गेले. “मी लहान सहावीत असताना भरपूर भेटायची आमच्या अंगणात मला”, ती पुन्हा बोलली. आता मात्र माझी थरथर कमी झाली. पण अंगाचा घाम काही केल्या जात नव्हता. कडक उन्हाळ्याचे दिवस होते ते. त्यात मराठवाडा असा दुष्काळी.
मी:- मला वाटतं आता एकही सापडणं मुश्कील होतं असेलं. नाही?
ती:- हो ना. आता पूर्वीसारखं राहीलचं नाही. घराला अंगणच नाही मग येणार कुठून?
( ती बोलत असताना मला तिच्या नजरेत एक वेगळचं कुतूहल दाटलेलं पाहायला मिळालं. असं वाटत होतं जणू तिला आयुष्याची फार प्रश्न उलगडायची आहेत. पण कदाचित तिला त्यासाठी योग्य मार्गदर्शकच भेटला नसेल.)
मी:- हो. त्यात हे आपलं शासन अजून रस्त्याच्या नादात घाट पोखरत चाललयं.
ती:- काय? कोणता?(आश्चर्याने)
मी:- मुंबई-गोवा हायवे चौपदरीकरण. त्यात घाट जाईलच सोबत वन्यजीव संपत्ती आणि झाडांच सोडं पण कोकणसौंदर्यच नष्ट होणारयं.
ती:- अरे यार किती वाईट. मी अजून पाहीलचं नाहीये.
मी:- पाहशील एक दिवस. नक्की बघं.
ती:- हो. सध्यातरी जाताजाता एखादं फुलपाखरू भेटलं तर बघते.
मी:- ओके. भेटेल अशी आशा करतो.
(इतक्यात तिचा स्टॉप आला आणि ती उतरली.)
ती:- बाय.
मी:- बाय. भेटू नंतर.
( ती निघून गेली पण मनात एक अनामिक ओढ निर्माण करून गेली. तिच्या डोळ्यांमध्ये दिसलेलं कुतूहल. आणि तिची फुलपाखरा बद्दलची असणारी आपुलकी. खरंतरं या सर्वांचा ताळमेळ मी जोडत होतो, ते तिला तिच्या आयुष्यात हव्या असलेल्या मार्गदर्शकाशी.)
              भेटेल कुणीतरी नक्कीच तिला. किंबहुना तिचं फुलपाखरू तिला एव्हाना भेटलही असेल. पण मला मात्र तिचं अचानक अनोळखीवरून ओळखीचं होणं भारून गेलं होतं. दिसायला फार सुंदर होती ती. निर्विवादपणे आवडली होती ती मला. पण कसं असतं…… काही गोष्टी सप्तरंगातल्या अविर्भावी न दिसणाऱ्या मृगजळातल्या तहानेसारख्या असतात. आता ते मृगजळ भास होऊण जर हवेत विरतं असेल, तर त्याला थोडी माझ्या एकट्याचा श्वास लाभण्याचं भाग्य प्राप्त होईल?


लेखक :- किरण बंडू पवार

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: