#मराठवाडा आणि परिस्थिती.

मराठवाडा आणि परिस्थिती.

                  तस पहायला गेलं तर पुष्कळ बाबतीत मराठवाड्या गेल्या काही वर्षांपासनं होरपळून निघालेला आपल्याला पहायला मिळतो आहे. मग ते दुष्काळी परिस्थिती असेल किंवा शिक्षणक्षेत्रातील बेरोजगारीशी निगडीत इतर गोष्टी असतील. मुळात या सगळ्यामधे नेमका दोष कुणाला द्यावा; याचा थांगपत्ता लावणं जरा अवघड आहे. शेतकऱ्यांच्या वाढत्या प्रमाणातील आत्महत्येला एक प्रकारे जबाबदार आपली शिक्षणप्रणाली असू शकते. कारण आपल्या भागात  प्रॅक्टिकल बेसड् शिक्षणाला तेवढं महत्व दिलं जात नाही. साहजिकच यात प्रथम चुक विद्यार्थ्यांची आहे. कॉलेजात पहायला गेलं तर विद्यार्थी थेट परिक्षेपुरतेच तिथे हजर असतात. अर्थात या गोष्टींचा पाठपुरावा अजूनतरी कोणतीच व्यवस्था करू शकली नसली तरी हे इथलं भयान वास्तव आहे. पुढे चालून मुले-मुली एका विशिष्ट डीग्रीचे अध्ययन पूर्ण करून स्पर्धा परिक्षांच्या तयारीला लागतात. तरूणांमधील काल्पनिकता व नवनवीन विचार यांना थारा मिळत नाही मराठवाड्यात. एकच ठरलेल असतं ते म्हणजे, स्पर्धा परीक्षा. आश्चर्य वाटतं, एखादा चांगला इंजिनीअर केवळ त्या एका गोष्टीसाठी स्वत:च्या मर्यादांना लगाम लावतो तेव्हा. उद्या चालून ज्याच्या हातून देशाचं इन्फ्रास्ट्रक्टर आणि तांत्रीक क्षेत्र प्रगत व्हायला हवं तो तासनतास त्या लायब्ररीत पुस्तक चाळत बसलेला असतो. मुळात स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांवर आक्षेप नाही पण ही सद्यपरिस्थिती आहे. दुष्काळावर जिथे मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात याव्यात त्या मराठवाड्यात त्या विषयांवर निबंध स्पर्धा राबवण्यात कसला आलायं कर्तबदारपणा..?
               घरची परिस्थिती बेताची असते. आणि अशातच मुले या स्पर्धा परीक्षांकडे कस लावून बसलेले असतात. त्यात तीन-चार वर्ष निघून गेल्यावर तरूणांच्या हाती इतर पैशांच साधन उभं करावं असे काहीच ठोस पर्याय दिसत नाहीत. काही ठराविक लेक्चररशीप वा इतर ठरलेले असतात. पण मुळातच हे तीन-चार वर्ष जिथे नाविन्यातून तरूण स्वत:ला प्रगत करू शकतात; त्याच  ऐनवयात ते या स्पर्धा-परीक्षांच्या तयारीचे गुलाम बनून जातात. नंतर निराशा आणि आत्महत्या हे पर्याय उपलब्ध आहेतच. मराठवाड्यातील शिक्षणात असलेली आणखी महत्वाची त्रुटी म्हणजे, स्त्रीशिक्षण. मराठवाड्यात आजही प्रत्येक खेड्या-पाड्यात मुलींनी जास्त प्रमाणात शिक्षण घेऊ दिलं जात नाही. आणि मुळात डिग्रीपर्यंत जरी शिकवलं तरी ते घरी बसवून फक्त परीक्षेलाच हजेरी लावून पूर्ण करवल्या जातं. जिथे स्त्री शिक्षीत व सक्षम असते; तिथे कशाचीच उणीव भासत नाही. ही आपल्या देशाची संस्कृती व इतिहास आहे. पण मराठवाड्यात हे चित्र पहायला मिळते का? मराठवाडा आजही विचारांच्या बाबतीत मागासलेलाच आहे. केवळ टेक्नोलॉजी वा इतर प्रसारमाध्यमांनी विचारसरणी बदलल्या जात नाही; याची प्रचीती मराठवाड्यात पुरेपूर येते. हुंडा पद्धतीवरून मागे भरपूर घटना घडल्या बऱ्याच प्रमाणत जनजागृती झाली. हुंडा पद्धतीच प्रमाणही कमी झालं. पण ते एका मर्यादित वेळेपुरतं. पुन्हा परिस्थिती जैसे थे झाल्याच पहायला मिळतं आहे. शेतकऱ्यांना योग्य हमीभाव न मिळणं, त्यातून दुष्काळातून त्याने शेती पिकवून मुलीच लग्न हुंड्यासहीत लावून देणं. शेतकरी किती गोष्टी सहण करणार? आजही मराठवाड्यात शेतीव्यतिरीक्त इतर व्यवसायाला तेवढं प्राधान्य नसल्याने सर्वस्त्र गोची झालेलीच पहायला मिळते आहे. पण मुळात असलेल्या अडचणी आजवर कधी मिडीयाने समोर आणल्याच नाहीयेत. जिथे टीआरपी तिथे मिडीया. मराठवाड्यातील पहिला मागास विचारांतील दुष्काळ जेव्हा बदलेलं; तेव्हा कुठे प्रगतीच्या वाटा खुल्या होतील. अन्यथा मराठवाडा कालही तसाच होता अन् उद्याही तसाच होरपळून निघणारा पहायला मिळेल.
             सध्याची स्थिती पाहता मराठवाड्याला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे ना की, फसव्या. आज मराठवाड्यातील तरूणाईने 21 पार होताच स्वत:चा रोजगार स्वत: उपलब्ध कसा करता येईल याकडे फोकस केला पाहिजे. आज तरूणाईने छोट्यामोठ्या अनेक युक्त्या उद्योगात लढवून यशस्वीरित्या ते उद्योग प्राॅपर चालवून दाखवले पाहिजेत. आज मराठवाड्यातल्या तरूणाईला विज्ञान आणि तंत्रज्ञानातले बरेचशे करिअर संधी माहिती नाहीत; ज्या तुम्ही जवळ असलेल्या इंटरनेटवरून माहित करून घेऊ शकता. तुम्हाला तुमच्या स्वप्नांचे पंख बांधता येऊ शकतात फक्त गरज आहे ती थोडसं स्वत:ला सिद्ध करण्यासाठी काहीतरी वेगळे व भारदस्त निर्णय घेत काहीतरी निर्माण करण्याची. मराठवाड्यातील तरूणाईसाठी महत्वाची बाब म्हणजे, मराठवाड्याच्या रक्तात जिद्द आहेच. त्यामुळे तुम्ही ठरवाल ते ध्येय मिळवू शकाल, एक ध्यास करून जीवणाला योग्य दिशेत घेऊन या एवढचं. मराठवाड्याने सध्या अधिक संधी नसताना केवळ एकाच कोणत्याही आशेवर राहणं जरा टाळावं. हा एक मोलाचा सल्ला.

लेखक – किरण बंडू पवार.

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: