#शेतीला बनवा उत्कृष्ट व्यापार, या 5 गोष्टींचा अवलंब करा व बना  नव्या युगातले नवे  5G  कास्तकार।

सध्या शेतकरी कर्जमाफी चा विषय जोरात चालू आहे,  कर्जमाफी झाली म्हणजे शेतकरी खूष असाच समज सगळ्यांचा झालेला दिसतोय पण या देशाच्या पोशिंदा असलेल्या बळीराजा ला का आत्महत्या करावी लागते ?का त्याला उभ्या आयुष्यात फाशी घ्यावी लागते ? का तो जन्मापासून मरेपर्यंत गरीबच राहतो?  का त्याच्या मुलांना नोकरीसाठी वणवण फिरावे लागते?  का त्याच्या बायकोला कित्येक दिवस एकाच साडीवर काढावे लागतात?  

अशा सर्व विषयांचा अभ्यास करताना कसं आपल्या शेतकर्‍यांना परावलंबी करण्यात आलं असून त्याला भिकेले लावण्याचं काम केले जात आहे असचं दिसून येतं।

जर तुम्ही एक गोष्ट ध्यानात घेतली कि भारत देशाचा विकास का होत नाही??

तर त्याचं एक कारण तुम्हाला दिसेल कि जो व्यक्ती इथे मेहनत करतो, कष्ट करतो तो इथे उपाशी मरतो व जो इथे दलाली करतो, रिकामा फिरतो तो बंगल्यांमध्ये ऐश करतो।

तर वरील उदाहरणावरून स्पष्ट आहे कि रिकामे लोकं जास्त सुखी राहतात म्हणून या देशातील जनता आरामाचे काम करण्याची स्वप्न पाहते कारण त्यांना माहिती आहे कि इथे कष्ट करणार्‍या लोकांना किंमत दिली जात नाही म्हणून।

याच गोष्टींमुळे शेतकरी परावलंबी होत गेला ।

अगोदरचा शेतकरी स्वयंपूर्ण होता,  त्याला कोणत्या गोष्टींची कमी नसे व तो सुखी होता व पूर्वीच्या काळात शेतकरी कधीही आत्महत्या सुद्धा करीत नसतं।

याचे कारण असे की गावे स्वयंपूर्ण होती,  गावामध्ये सर्व वस्तू मिळायच्या त्यामुळे गावातला पैसा कुठेही बाहेर जात नसे,  शेतात खाण्यापिण्याच्या सर्व वस्तू होत,  गावामध्ये  कपडे शिवून घेणे,  चपला,  सगळी संसाराची कामे गावातच मिळायची म्हणून लोकांची लूट होत नसे।

आताच्या काळात शेतकर्‍यांच्या वस्तू विकण्याचे मार्केट आहे तिकडचे सर्व दलाल हे व्यापारी आहेत,  ते शेतकर्‍यांची लूट करतात,  उत्पन्न विकणारे शेतकरी हे त्या दलालांना कशाची दलाली देतात हेच समजत नाही।

ते  दलाल इतके माजलेत कि सोन्याच्या चेन व अंगठ्या घालून मार्केटात मिरवतात,  त्यांचे लहान लहान पोरं आपल्या बापाला अरे तुरे बोलतात,  हे कसलेही काम करत नाही तर मग एवढा माज यांना येतो कुठून?  

             मी लहान असताना वडिलांसोबत धान्य मार्केट मध्ये जायचो तिथे ते लोकं लाथा देऊ देऊ त्या धान्यावर नाचतात व मग भाव ठरवितात,  कापसाच्या मार्केट मध्ये कधी जाल तर लक्षात येईल कि पहिले गाडी बघताना लिलावात वेगळा भाव ठरवितात,  नंतर आतमध्ये गेल्यावर परत त्यांचे लहान लहान पोरं ज्यांनी कधी कापूस कोणत्या झाडाला लागतो हेही बघितले नसते ते अजून त्या चिट्टिवरचा भाव कमी करतात,  बिचारा शेतकरी त्याला विनवण्या करतो पण तो ऐकत नाही।

भाषा तर एकदम खराब असते त्यांची 60 वर्षांच्या शेतकर्‍यांशी तो व्यापाऱ्याचा मुलगा असा बोलतो जसा कि तो त्याचा गुलाम आहे।

हे सगळं चाललयं आपल्या जीवावर,  तुमच्या आमच्या शेतकरी बापाच्या जीवावर।

आपली लूट कशी चालू होते?

बियाणे घेण्यापासून ते आपला माल विकेपर्यंत आपल्याला प्रत्येक ठिकाणी दलाल हा लूटायला तयार असतो,  आपल्याला जर खरा विकास करायचा असेल तर या दलालांच्या तावडीतून सुटणे अत्यंत आवश्यक आहे,  नाहीतर हे आपल्याला कावळ्यासारखे फोडू फोडू खातील ।

अर्थात सर्वच दलाल व व्यापारी हे वाईट असतात असे नाही, काही काही खूप चांगले आहेत ते शेतकर्‍यांच्या साठी समाजसेवेचे काम करतात पण असे लोक खूप कमी आहेत।

शेती या क्षेत्रातील जास्तीत जास्तं दलाल व व्यापारी यांची ही समजूत बनली आहे की शेतकरी हा लाचार व गरीब आहे आणि तो काहीही करू शकणार नाही।

म्हणून शेतकरी बांधवांनो आपल्याला या समजूतीतून बाहेर पडून स्वतःला सिद्ध करावे लागेल व शेतीला एका उत्कृष्ट व्यवसायाचा दर्जा मिळवून द्यावा लागेल।

या 5 गोष्टींचा अवलंब करा व बना  नव्या युगातले नवे  5G  कास्तकार।

1 शेतकरी अँप  

प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात शेतकरी मालाचे अँप बनवा एवढे आपली पोरं इंजिनीअर आहेत , दुसर्‍या कंपन्यासाठी हमाल्या करतात,  अरे बनवा ना एखादी चांगले अँमेझान च्या दर्जाच

इ कॉमर्स अँप जेथे सगळ्या  शेतीविषयक वस्तू डायरेक्ट विकल्या जातील,  जिथे स्वतः ग्राहक आपल्या शेतकरी बापाला फोन करून आर्डर देतील पण नाही ,तुम्ही इंजिनीअर नुसते नोकऱ्यांची भिक मागणारे,  समाजासाठी काही भले करावे हे तुमच्या डोक्यातचं येत नाही।

असं जर आपण काही अँप वगैरे आपण काढलं ना तर सगळे दलाल आपोआप बंद होतील,  गिऱ्हाईक ला स्वस्त माल मिळेल व आपल्यालाही नुकसान होणार नाही।

उदाहरणार्थ – जेव्हा एखाद्या भाजी मार्केटमध्ये शेतकरी भाजीपाला घेऊन जातो तेव्हा तिथला दलाल त्याच्याशी भावबाजी चालू करतो कारण त्याला माहिती आहे की तोडलेला भाजीपाला शेतकरी परत घरी नेणार नाही म्हणून कारण भाजीपाला खराब होतो हे त्या दलालाला माहिती आहे यायाच तो फायदा उचलतो।

व यातच दलालाचं फावते म्हणून जर समजा शेतकर्‍यांच्या वस्तू विकण्याचे एखादे आनलाइन अँप असेल तर शेतातून भाजी तोडण्या आधीच मालाची ची क्वालिटी बघुन आर्डर मिळेल व यामुळे शेतकरी बापाचे नुकसान होणार नाही।

या अँपवर नुसता भाजीपाला च नाही तर गहू,  तांदूळ,  तुरीची डाळ, दूध व जेवढे काही शेतकरी उत्पादने असतील ते आपण स्वतः किंमत ठरवून शेतकरी विकू शकेल,  म्हणजे दलालांना डायरेक्ट नो एन्ट्री।

शेतकरी बांधवांनो अँमेझान सारख्या अँप वर सुद्धा तुम्ही अँमेझान सेलर बनून आपल्या शेतातल्या उत्पादनांचे पँकिंग करून विकू शकता,  इकड तिकडच्या रिकाम्या  गोष्टी करण्यापेक्षा त्यात लक्ष घाला ।

एकदम सोपी पद्धत आहे,  काहीही कठीण नाही , नसेल समजत तर आपल्या पोरांना शिकायला सांगा,  आजकाल युट्यूबवर प्रत्येक गोष्ट शोधली कि लगेच त्याचे सोल्यूशन मिळते।

2  प्रोसेसिंग कंपनी  

आपण शेतात जे उत्पन्न घेतो ते एक प्राथमिक उत्पादन असतं म्हणजे आपल्या उत्पादनापासून इतर उत्पादने बनतात जसे की आपलं उत्पादन दुसर्‍या उद्योगात कच्चा माल म्हणून वापरले जाते।

समजा एक बिस्किटे बनविणारी कंपनी तिला कच्चा माल म्हणून गहू लागतात,  कपडा बनविणाऱ्या कंपनीला कापूस किंवा धागा लागतो,  सोया मिल्क साठी सोयाबीन लागतं इत्यादी।

आपण जर आपल्या पोरांना नोकऱ्यांच्या मागे न लावता जर आपण जे उत्पन्न घेतो त्यापासून प्रोसेसिंग करून काहीतरी नवीन बनवायला,  नवीन उत्पादन तयार करायला लावलं तर कसं राहील,  कारण कच्चा माल विकण्यापेक्षा एखादं दर्जेदार उत्पादन तयार करून विकले तर तुम्हाला कधीही कोणापासून कर्ज घ्यायची वेळ येणार नाही।

यासाठी मोठ्या निधी ची आवश्यकता पडेलच पण सूरूवातीला छोट्या छोट्या स्वरूपात अगदी जसं जमतं तसं कामाची सुरुवात केली ना तर आपोआप मार्ग सापडत जातील , व्यवस्थापन शास्त्रात एक नियम आहे तो म्हणजे  ,”planning means half done” म्हणजे फक्त एखाद्या गोष्टीची चांगली योजना जरी बनवली ना तरी अर्धे काम फत्ते झालेच म्हणून समजा।

पैशाची समस्या आपण काही शेतकरी एकत्र येऊन, एकीचे बळ दाखवून सोडवू शकतो।

आणि विचार करा जर अशा शेतकर्‍यांच्या छोट्या छोट्या कंपन्या उभ्या राहिल्या तर हे बिनकामाचे दलाल कोणाला लुटतील?? हे तुमच्या शेतकर्‍यांकडे कामाला येतील।  ऊस तोडायला, कापूस वेचायला,  शेण काढायला इत्यादी।

यामुळे आपल्याला कधी कोणाला हमी भाव मागायची गरज पडणार नाही ,  आणि एक गोष्ट लक्षात ठेवा शहरातील  लोक शेतकरी उत्पादने वापरणे खुप पसंद करतात म्हणून तुमचे ग्राहक अगदी तयारचं बसले आहेत। गरज आहे आता फक्त मैदानात उतरण्याची।

3  पोरांना नुसतं बेरोजगार करणारं शिक्षण देऊ नका

आजकालची आपली पोरं खूप शिकतात,  खूप शिकतात पण नोकरी मिळाली नाही म्हणून मग बापाच्या जीवावर बसून खातात,  खूप शिकला म्हणून मग शेतात जायची, बैल चारायची लाज वाटते।

आता तुम्हीच सांगा एखाद्या व्यापाऱ्याचा मुलगा परदेशातून जरी शिकून आला तरी दुकानात बसणे थांबवतो का?  नाही ना ! मगं आपले पोरं एवढे कसे काय माजतात?  

पोरांना शिक्षण देणे जरूरी आहे पण शिक्षण नुसते नोकरीसाठी नसावे तर शिकून त्याने आपल्या घरासाठी, समाजासाठी,  देशासाठी काहीतरी करावे यासाठी शिक्षण आहे पण हे आपले पोट्टे

नोकरी नाही लागली कि काहीच करत नाहीत ।

आता एवढ्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या देशात सरकार सगळ्यांना तर नोकर्‍या देऊ शकत नाही आणि जर आपले पोरं खरचं हुशार असतील तर बनतील ना कलेक्टर, मोठ मोठे अधिकारी वगैरे पण जर ते तिकडे काही करू शकले नाही तर त्यांना आपल्या शेतीत काम करण्याची सवय लावावी। त्यामुळे समोर त्यांना काम करायची लाज वाटणार नाही।

असे बरेच आईवडील शेतकरी आहेत ज्यांची पोरं रिकामी खोल्या करून शहरात राहतात कारण शेतातलं काम करायची लाज वाटते म्हणून तर अशा सवयी चुकुनही आपल्या पोरांना लावू नका,   जर शहरात पोराला राहायचचं असेल तर त्याला एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय लावून द्या,  रिकामे राहण्याची सवय पोरांना लावू नये।

4  शहरातील नातेवाईकांचे लाड लावू नका।

आपले शहरातील नातेवाईक नेहमी सुट्टी असली की चालले गावाला,  जाताना तुरीची डाळ,  भाजीपाला,  गादी भरायला कापूस,  गहू इत्यादी  सगळं आपल्या शेतकरी नातेवाईकांपासून फुकट लुटून नेतात।  वरून आपला शेतकरी त्यांना कपडे, साड्या इत्यादी घेऊन देतो ,पण कधी शहरातले लोक तुम्हाला शहरात फिरायला बोलवतात का?  त्यांना आपली खेड्यातील लोकांची तिकडे गेल्यावर लाज येते, जेव्हा शेतकरी एखाद्या कामानिमित्त शहरात नातेवाईकाकडे गेला तर त्यांची पोरं धडं बोलतसुद्धा नाहीत।   एक दिवस राहून जा असेही कोणी म्हणत नाही।

कधी ते लोकं एखादी वस्तू आपल्याला देतात का मोफत कि जा गावाकडे घेऊन म्हणून?  नाही ना!!  अरे तर मग आपण आपले फुकटचे गहू,  डाळ यांना का देतो, तेही फुकटात आणि म्हणूनच आपण गरीब आहो।

अर्थात सर्वच शहरातील लोक असे असतीलच असे नाही, काही चांगले पण आहेत पण 99% असेच आहेत म्हणून दोस्तांनो आपली बायको जुनी साडी घालते तिला नवीन कपडे घ्या,  स्वतःच्या पोरांना घ्या पण या फुकटखाऊ नातेवाईकांना काहीही फुकट देऊ नका।

आणि निर्लज्जपणाचा कळस म्हणजे तुमचचं फुकट खाऊन ते तुम्हालाच उलटे सल्ले देतात।  

काही लोकांचे अर्धे जास्त जीवन नुसते जावयांचे, बहीण जावयांचे देणेघेणे करण्यात जाते मग कशी हो तुमची परिस्थिती सुधारणार?  विचार करा थोडा तरी आता।

5  छोटा परिवार ठेवा

एखाद्या मोठ्या साहेबांच्या घरी जा, त्यांना एक मुलगा किंवा एक मुलगी असते।   साहेब मोठ्या पदावर पगार लाख रूपये,  साहेबांची मँडम मोठ्या पदावर तिलाही लठ्ठ  पगार व दोघेही कमावते असून एकच मुलगा किंवा मुलगी ठेवतात।

आता आपल्या शेतकर्‍यांच्या घरी जा,  तिकडे सुरेश,  रमेश टीवी बघत,  सीता स्वयंपाक करते,  गीता बी असते म्हणजे एवढे कशाला?

आता जो व्यक्ती जास्त पैसे कमवितो तो छोटा परिवार ठेवतो म्हणजे जास्त कमाई तरीपण त्याच्या परिवारात कमी लोक असतात आणि आपल्या कडे  कमाई कमी पण लोक जास्त,   दोस्तांनो हे जुनं सोडा आता कमीत कमी कुटुंब कसं ठेवता येईल  याचा प्रयत्न करा।

कारण एका मुलाला किंवा मुलीला तुम्ही चांगले उच्च दर्जाचे शिक्षण देऊ शकता, व्यवसाय थाटून देऊ शकता पण जास्त मुलं असली की गरीबी तुमची वाट सोडेल काय ? नाही ना!

म्हणून काही गोष्टींवर अभ्यास करा,  स्वतःमध्ये परिवर्तन करा व बना 5G कास्तकार,  आता शेतकऱ्यांचे पण विकासाचे पर्व सुरू झाले हे सर्व जगाला दाखवून द्यावे लागेल। आणि जबाबदारी एकटी शेतकर्‍यांची नाही तर अधिकारी बनलेली शेतकऱ्यांची मुले,  शेतकरी नेते व शेतकर्‍यांच्या विकासासाठी काम करणारे समाजसेवक यांनीही शेतकर्‍यांना मदत करायला हवी।  कारण जर भारताला विकसित राष्ट्र म्हणून मिरवायचे असेल तर इथला शेतकरी सुखी होणे जरूरी आहे।

जयहिंद।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: