#अंग्रेजी मिडियम#नवीन रिलीज# आजचा चित्रपट#

इरफान खान,  दीपक डोबरियाल, राधिका मदन,  करीना कपूर,  रणवीर शौरी, पंकज त्रिपाठी ,कीकू शारदा यांच्या भूमिका असलेल्या अंग्रेजी मिडीयम हा चित्रपट आज प्रदर्शित झाला।

इरफान खान यांनी कँन्सर वर मात करून या चित्रपटा द्वारे कमबँक केले आहे।

कधी कधी आपण आजूबाजूला बघतो की काही लोक विदेशात जाऊन सेटल झालेले असतात आणि आपल्याला वाटतं की ते तिकडे खूप आनंदी आहेत पण प्रत्येकदा विदेशात राहणारे किंवा पाश्चिमात्य देशात राहणारे भारतीय लोक तिकडे खूष असतीलच असे काही नाही,  बर्‍याच लोकांच्या आयुष्यात आपल्या सारख्याच किंवा आपल्या पेक्षाही गंभीर समस्या असतात।

आपण बघितले असेल इकडचे काही लोक तिकडे जाऊन झाडू मारणे, टँक्सी चालविणे अशी कामे करतात व भारतात येऊन मोठ्या मोठ्या फोकनाड गोष्टी सांगतात।

भारतीय शाळा – कॉलेजांना कमी समजणार्‍या,   भारतीय संस्कृतीला कमी समजणार्‍या  अशा सर्व लोकांसाठी या चित्रपटाने चपराक मारली आहे,   अशा लोकांना नक्की अंग्रेजी मिडीयम विचार करायला लावेल।

हिंदी मिडीयम या सिनेमाचा सिक्वल असलेल्या  या सिनेमात खरचं मन जिंकून घेण्याची क्षमता आहे।

आपल्या मुलीसाठी कष्ट करणारा, तिची काळजी घेणारा, तिच्या लंडनमध्ये शिक्षण घेण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी  सर्व पणाला लावणारा बाप चंपक,

भलेही कौटुंबिक वाद कोर्टात गेलेला असला तरी आपल्या भावाच्या प्रत्येक संकटात साथ देणारा नात्यातील भाऊ गोपी ,  

आपल्या कुटुंबातील मुलीच्या शिक्षणासाठी सर्व वाद विसरणारे नातेवाईक,

आपल्या मित्रासाठी जिवाला जीव देणारा मित्र गज्जू

हे  असे लोक फक्त भारत देशातच मिळू शकतात  , नुसते सिनेमातचं नाही तर रियल लाईफ मध्ये ही असे लोक फक्त आपल्या देशातच मिळू शकतील ।

कथा

तर चंपक (इरफान खान)  व गोपी( दीपक डोबरीयाल)  हे राजस्थान च्या एका मिठाई चा व्यवसाय करणाऱ्या घसीटेराम बंसल कुटुंबातील सदस्य असतात।  ते नात्याने एकमेकांचे भाऊ लागतात,   चंपकला च्या बायकोचा मृत्यू झालेला असतो आणि त्याला एक तारिका नावाची मुलगी असते  व  गोपी ची बायको त्याला सोडून गेलेली असते ।

आता घसीटेराम बंसल जो मिष्टान्न व्यवसायातील  एक मोठे नावं असते तो मरण पावलेला असतो त्यामुळे त्याच्या भल्या मोठ्या कुटुंबात घसीटेराम चे नाव दुकानावर ला़वण्यावरून व घसीटेराम च्या नावाने मिठाई विकण्यावरून वाद चालू असतो।

मुख्य वाद चंपक व गोपी यांच्यात असतो त्यामुळे कुटुंबातील काही लोक चंपकच्या बाजूने तर काही लोक गोपीच्या बाजूने असतात।

गोपी (दीपक डोबरीयाल)  हा कोर्टातील न्यायाधीशाला आपल्या बाजूने निकाल देण्यासाठी 9 लाख रूपयांचे रोलेक्स चे घड्याळ  लाच म्हणून देतो,  म्हणून गोपी केस जिंकतो व घसीटेराम चे नाव लावण्याचा अधिकार त्याला मिळतो।

इकडे मुख्य पात्र असलेली तारिका (राधिका मदन) तिची 12 वी परीक्षेत 85% घेऊन काँलेजात चौथी येते,   त्यामुळे तिला लंडन मधील ख्यातनाम युनिव्हर्सिटी मध्ये प्रवेश मिळणार असतो ।

मुलगी दूर जाईल या भितीने चंपकला चांगले वाटत नाही , पण तारिकाला लंडनला जायची, तिकडे सेटल होण्याची इच्छा असते कारण तिला जगण्यासाठी स्वतंत्र जीवनशैली हवी असते,  आपल्या जीवनात आपल्या वडीलांनी जास्त लुडबूड करू नये,  आपल्याला स्वतःच्या मर्जीनुसार वागता यावे म्हणून ती बाहेर जाण्याची इच्छा बाळगून असते।

तारिका लंडनला जाण्यासाठी क्वालिफाय झाल्यानंतर तिच्या ज्युनियर कॉलेजात एक सत्कारासाठी कार्यक्रम ठेवण्यात येतो त्यामध्ये गेस्ट लेक्चर म्हणून त्याच न्यायाधीशाला बोलविण्यात येते जो न्यायाधीश लाच घेऊन घसीटेराम चे नाव लावण्याचा अधिकार गोपी ला देतो ।

स्वतः भ्रष्ट असणारा

तो न्यायाधीश आपल्या भाषणात मोठमोठ्या इमानदारी च्या गोष्टी करतो त्यामुळे चंपक ला बरेच हसू येते।

नंतर जेव्हा चंपकला यशस्वी मुलीचे वडील म्हणून स्टेजवर बोलण्याची संधी मिळते तेव्हा तो त्या न्यायाधीशाची पूर्ण पोल खोलून टाकतो।

काँलेजची प्रिंसिपल ही त्या न्यायाधीशाची बायको असते व आपल्या पतीचा चंपक मुळे अपमान झाला म्हणून ती विदेशी युनिव्हर्सिटी चे तारिकाचे अँडमिशन अप्रुवल  लेटर फाडून टाकते ।

आता लंडनमध्ये काँलेजकडून जाण्याचा मार्ग बंद होतो पण चंपक त्या प्रिंसीपल ला आपल्या मुलीची अँडमिशन त्याच लंडनच्या युनिवर्सिटी त करणार असा चँलेंज देऊन आलेला असतो।

ते प्रायव्हेट कंसलटन्सी कडून अँडमिशनसाठी प्रयत्न करतात तेव्हा

विदेशी लोकांसाठी जागा फुल झाल्या असं त्यांना कळते।

मग लंडनमध्ये असलेल्या त्यांचा मित्र बबलू (रणवीर शौरी) ची मदत घेण्यात येते व तो काही पैसे घेऊन मदत करण्यासाठी तयार होतो पण नंतर जेव्हा  चंपक, गोपी आणि तारिका तेथे जातात तेव्हा बबलू ला अटक झालेली असते त्यामुळे तो काँल घेत नाही।

बेकायदेशीर कामामध्ये असलेल्या बबलू ची एअरपोर्टवर ओळखी सांगितल्या मुळे  गोपी आणि चंपक ला लंडनला येण्यासाठी ब्लॅकलिस्ट केले जाते।  तारिका यांच्या सोबत असल्याचे पोलिसांना कळत नाही त्यामुळे ती यामधून सुटते।

तिकडे तारिका एकटीच शहरात पोहोचलेली असते व जेलमध्ये असलेला बबलू काँल घेत नाही आणि गोपी व चंपक सूद्धा परत गेलेले असतात।

ती शहरात युनिव्हर्सिटी तील काही मित्रांच्या मदतीने एक मिसेस कोहली (डिंपल कपाडिया) चे घरी कीरायाने

राहते व तिच्याच दुकानात पार्टटाईम नोकरी करते ज्यामुळे ति स्वतःचा खर्च सहज करू शकेल।

आपली मुलगी लंडन सारख्या शहरात एकटी आहे व ति संकटात असेल या भितीने चंपक परत लंडन ला जाण्याची इच्छा आपला मित्र गज्जू(किकू शारदा)  कडे व्यक्त करतो।

गज्जू त्यांना दुबई ला असलेल्या टोनी(पंकज त्रिपाठी)कडे पाठवतो ।

चंपक व गोपी यांचा भारतीय पासपोर्ट लंडन मध्ये ब्लॅकलिस्ट झाल्यामुळे टोनी त्यांना पाकिस्तानी नागरिक बनवून नकली पासपोर्टवर लंडनला पाठवतो।

लंडनमध्ये पोलिस अधिकारी असलेल्या करीना कपूरला या दोघांवर शक होतो पण हे तेथून निसटतात।

तिकडे गेल्यावर वडील आणि मुलीमध्ये बरीच अणबन होते,  कमवायवा लागलेली तारिका आपल्या वडीलांना सर्व पैसे परत देईन असं बोलते व ती चंपक सोबत राहण्याऐवजी एकटे राहणे पसंत करते।

त्यामुळे चंपकला खूप दुःख होते।

एकदा तर तारिका एका मुलाला किस करत असते तेवढ्यातच चंपक तिच्या घरी जातो,  तेव्हा ती  तुम्ही नाँक करून यायला पाहिजे होतं असं वडीलांना म्हणते,  तेव्हा खरचं खूप वाईट वाटते।

त्या मुलीला आपल्या बापापेक्षा आपली प्रायवसी व खासगी फ्रिडम महत्त्वाचे असते याचे खूप वाईट वाटते।

लंडन मधला चंपक चा मित्र बबलू (रणवीर शौरी)  अत्यंत गरीबीत जीवन जगत असतो,  त्याची जेलमधून गोपी व चंपक जमानत करतात नंतर तोच बबलू तारिकाच्या अँडमिशन साठी खूप प्रयत्न करतो व शेवटी तिला अँडमिशन मिळते।

आपल्या लंडन मध्ये अँडमिशन साठी गोपी व चंपक यांनी अत्यंत फेमस असलेले घसीटेराम नावाचे ब्रँड दुसर्‍याला विकले आहे हे जेव्हा तारिकाला कळते तेव्हा ती लंडन मध्ये शिक्षण घेण्याचा हट्ट सोडते व भारतातच समोरचे शिक्षण घेण्याचा निर्णय घेते।  आणि घसीटेराम या ब्रँड ला जगभरात पोहोचविण्याचा निर्धार करते।

चित्रपटामध्ये भारतीय संस्कृती व भावनांना प्रकट केले असले तरी विदेशांमध्ये मोठमोठ्या लोकांची मुलं वयाच्या 18 वर्षांनंतर नोकर्‍या करून कसे स्वतःच्या पायावर उभे राहतात ही दुसरी बाजू सुद्धा दाखविली आहे।   

करीना कपूर आणि डिंपल कपाडिया या आई मुलींचही आपापसांत जमत नाही,  एकदा जेव्हा डिंपल कपाडिया ला हार्ट अटँक येतो तेव्हा चंपक ( इरफान)  करीना ला म्हणतो।

की   तुम्ही,  18 वर्षांनंतर आपल्या आईबापांना सोडून देता मग 18 वर्ष त्यांच्या सोबत फक्त एक बिजनेस म्हणून राहता काय?   हा सिन खरचं खुप इमोशनल करतो।

अँक्टिंग सर्वांची अगदी मस्त आहे,  मोठमोठे कलाकार असून सुद्धा काहींना जास्त सीन मिळाले नाहीत तरी सर्वांनी आपली छाप सोडली आहे।

पंकज त्रिपाठी, कीकू शारदा,  करीना कपूर, डिंपल कपाडिया यांनी अतिशय कमी वेळाचे सीन मिळून ही प्रभावी काम केले आहे।

बबलू च्या भूमिकेत रणवीर शौरी एकदम सूट करतो ।

सिनेमाचे मुख्य नायक जे पूर्ण वेळ स्क्रीनवर राहतात ते दीपक डोबरीयाल आणि इरफान खान यांचे इमोशन्स, काँमिक टाइंमिंग खूप जबरदस्त आहे।

राधिका मदन ने तारिक बंसल च्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे।

या सिनेमात म्युझिक चांगले आहे पण आवश्यकते एवढीच गाणी आहेत म्हणजे बाकी मसाला मुवी सारखे जबरदस्ती ने गाणी टाकली नाहीत त्यामुळे दिग्दर्शकाने जास्तीत जास्तं कथेतून आपल्या मेसेज लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे।

विषय भावनिक असला तरी त्याची मांडणी एका गमतीशीर काँमेडी पद्धतीने केल्यामुळे पाहायला मजा येते।

का पाहावा?

जर आपल्या घरी जवान मुली मुलं असतील तर त्यांच्यासोबत हा चित्रपट अवश्य पाहा,  तुमचे आपल्या मुलासोबत नाते अधिक घट्ट होईल।  व आपल्या आईबापाला आपली जास्त काळजी असते म्हणून ते जास्त विचारपूस करतात याची मुलांना जाणीव होईल।

चित्रपट अत्यंत चांगला आहे पण जर तुम्ही नेहमीप्रमाणे हिरो हिरोईन चे प्रेम, अँक्शन इत्यादी पाहणारे प्रेक्षक असाल तर तुम्हाला आवडणार नाही पण जर एक काहीतरी वेगळा  जीवन बदलवायचा विषय बघण्याची इच्छा असेल तरच हा चित्रपट बघा।

रेटिंग  4/5

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: