#कर्जाचा डोंगर

मी एक कर्जात अडकले गेलेला व्यक्ती , काही स्वतःच्या चुकांमुळे तर कधी खांद्यावर आलेल्या जबाबदारीमुळे पण यामध्ये जबाबदारी पेक्षा माझ्याच चुकाचं माझ्या विनाशाला जास्त कारणीभूत ठरल्या पण मी केलेल्या चुका तुमच्या हातून घडू नयेत म्हणून हे पुस्तक लिहीत आहे.  यामध्ये मी माझ्या चुका मी केलेल्या किंवा नकळतपणे माझ्या हातून घडलेल्या तुम्हाला सांगिल यामधून आवश्यक तो बोध घेऊन आपण आपले अर्थ विषयक जीवन सुकर करावे असे मला वाटते ।

खरं तर मी बिझनेस मँनेजमेंट चा विद्यार्थी आहे तेही फायनान्स हा विषय घेऊन प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला , लहानपणापासून चं मी अत्यंत अभ्यासात हुशार होतो सोबतच मी नावाजलेल्या बँकेत नोकरी करायचो तरीसुद्धा मी कर्जात बुडलो मग जो सामान्य माणूस असतो ज्याला कोणतेही अर्थविषयक ज्ञान नसते तो किती चुका करत असेल ?

खरं तरं आजच्या काळात मुलांना अर्थविषयक सल्ले मिळणं खूप कठीण होऊन बसले  आहे कारण शाळेत असे काही विषय शिकविले जातात ज्यांच खर्या आयुष्यात काही कामचं पडत नाही आणि ज्याचं काम पडतं त्या गोष्टी बर्याचश्या लोकांना माहितीचं नसतात ।

अनेक लोकं म्हणतात की आयुष्याला योग्य कलाटणी देण्यासाठी एखादी गुरु असावा पण माझ्या आयुष्यात असा एकही गुरु नव्हता कारण माझ्या तापट स्वभावामुळे माझं कधीही कोणत्याही माणसाशी जास्त काळ पटत नसे , त्यामुळे गुरु किंवा सल्लागार  मिळाला नाही आणि मी  आपल्या हट्टी व एककल्ली स्वभावामुळे कधी कोणाचं ऐकलही नाही ।

थोडक्यात कायं तर ही माझ्या आजपर्यंत च्या आर्थिक जीवनाची कहाणी आहे ।

कर्ज घेणे चांगले की वाईट या वादात मी पडत नाही कारण एका अर्थाने बघितलं तर कर्ज घेणे वाईट आहेच परंतु उद्योग,व्यवसायाला मोठं करण्यासाठी , कधी अचानकपणे उद्भवलेल्या संकटातून सावरण्यासाठी कधी कधी  कर्ज घ्यावे लागते  म्हणून माणसाने जीवनात येणाऱ्या चढ उतारांसाठी नेहमी तयार राहावे लागते  ।

जेव्हा लोकं आपल्या आयुष्याची कथा लिहीतात तेव्हा त्या कथेला मोठमोठाली नावे देत असतात कारण त्यांच आयुष्य असतही तसचं पण माझ्या आयुष्यात मी नेहमी एका आर्थिक संकटातून बाहेर पडलो की लगेच दुसऱ्या संकटात सापडायचो व मी माझे आयुष्य बदलले सुद्धा , यश मिळवले सुद्धा पण जर मी काही गोष्टींचा अगोदरच हिशेब केला असता तर कदाचित या आर्थिक संकटातून निसटलो असतो पण असो ते म्हणतात ना देर आए दुरूस्त आए ते खरेच आहे , पण मित्रांनो तुम्ही कसलीही वेळ करू नका नाहीतर आयुष्य प्रत्येक माणसाला वारंवार संधी देत नाही ।

तर तुम्हाला जर विषय आवडला असेल तर समोर वाचा नाहीतर वेळ न घालवता आपल्या कामाला लागू शकता ।

वडीलांनी माझ्यासाठी खूप कष्ट उपसले होते त्यामुळे सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो ।

व माझ्या आयुष्यात मोलाची साथ देणारे व संकटकाळी मला मदत करणारे माझे मित्र यांचेही खूप खूप आभार मानतो ।

धन्यवाद ।

अनुक्रमणिका

1  पैशाचे न समजलेले महत्त्व

2  स्वतःला श्रीमंत दाखविण्यासाठी केलेला दिखावा

3  कर्ज घेऊन घर बांधले

4  व्यवसायात जम बसण्याआधीच नोकरी सोडली

5  संकटात नेहमी एकटचं लढावं लागतं

6  पैसे कमविताना शिक्षण घ्यावं की नको ?

7  संधीचे सोने

8 नोकरी की व्यवसाय

9  बँकेचे व्यवहार बंद

10 कमाईची इतर साधने

1  पैशाचे न समजलेले महत्व


माझा जन्म एका चांगले मध्यमवर्गीय व सुशिक्षित कुटुंबात झाला । मला लहानपणापासून पैशाची कसलीही अडचण नव्हती त्यामुळे चांगल्या वातावरणात व चांगल्या आर्थिक परिस्थितीत माझे पालन पोषण झाले ।

मला लहानपणापासूनच नवीन नवीन वस्तू घेण्याची, नवीन कपडे घेण्याची सवय होती , कोणाजवळ काही  नवीन दिसले की लगेच दुसऱ्या दिवशी ती वस्तू मी  वडिलांना घेऊन मागत असे त्यामुळे गरिबी मी कधी बघितली नाही तसे आम्ही जास्त श्रीमंत नव्हतो पण जास्त गरीब पण  नव्हतो कारण आमच्याकडे प्रत्येक वस्तू होती ।
त्यामुळे मला पैशाची महत्त्व कधीच समजले नाही ब्रँडेड कपडे घालणे ,चांगल्या महागड्या वस्तू वापरणे या सवयी मला लहानपणापासूनच  लागल्या होत्या।

आई-वडिलांनी मला नेहमी समजून घेण्याचा प्रयत्न केला की पैसे सांभाळून खर्च करत जा म्हणून पण माझं मत काही औरत होतं त्यामुळे मी पैशाचे महत्त्व समजून घेतले नाही ।

फालतु  गोष्टीवर जास्त पैसा वायफळ खर्च करून घेण्याची खराब सवय मला लागली  त्याचा परिणाम असा झाला की मला पैसे पुरत नव्हते । मी महाविद्यालयीन जीवनात असताना देखील घरून जे पैसे यायचे ते लवकरच संपून जात असत त्यामुळे इकडे-तिकडे मित्रांकडे मागायची सवय लागली ।


पहिली चूक

मित्रांनो प्रत्येक माणसाला पैशाचे महत्व कळले पाहिजे  जर तुम्हाला आयुष्यात प्रगती करायची असेल तर पैसा हा खूप महत्त्वाचा आहे कारण म्हणतात ना , “सर्व गोष्टीचे सोंग करता येते पण पैशाचे सोंग करता येत नाही “ अशी म्हण आहे म्हणून आता सर्वप्रथम पैशाचे महत्त्व समजून घ्या कारण  आयुष्याच्या प्रत्येक अडचणीत आपल्याला पैसाच कामी येतो ।

काही लोक म्हणतात की पैसा महत्त्वाचा नाही म्हणून पण आयुष्यात प्रत्येक गोष्टी साठी  पैसा महत्त्वाचा असतो फक्त तो चुकीच्या मार्गाने कमावलेला नसावा ।

जेव्हा आपण पैशाचे महत्त्व जाणतो तेव्हा त्याची बचत करायला शिकतो त्या बचतीतून पैसे शिल्लक राहतात व महत्त्वाच्या क्षणी ते आपल्यालाच कमी पडतात ।

काही काही लोक पैशाच्या बाबतीत खूप कंजूष असतात पण माणसाने एकदम पोटाला मारून पैसा बचत करू नये तर आयुष्याचा आनंद  घेऊन वायफळ खर्च न करता पैसे वाचविले पाहिजे ।


पैसे बचत करण्याची सवय आपल्याला नेहमीच समोर नेतेे

उदाहरणार्थ मी या असे  खूप लोक पाहिलेत की जे महिन्याला लाखो रुपये कमावतात पण शेवटी त्यांच्याकडे एकही रुपया वाचत नाही , असे का होत असेल.?? कारण एवढा भलामोठा पगार  असूनही तुम्ही वाचवू शकत नाही म्हणजे  तुम्ही किती कमविता याला काहीही अर्थ नाही तर  तुम्ही  किती पैसे वाचविता याला अर्थ आहे  ।

समजा एखाद्याची  कमाई खूप जास्त आहे पण तो आपल्या कमाईला जर आपल्या संपत्तीत परिवर्तित करू शकत नसेल तर अशी कमाई कोणत्याही कामाची नाही ।।

तर ही माझ्या आयुष्यातली पहिली चूक होती  ती म्हणजे पैशाची बचत कशी करावी किंवा पैशाचे महत्व मला समजले नव्हते त्यामुळे ती सवय दीर्घ काळ माझ्या सोबत राहीली  तर मित्रांनो तुम्ही आपल्या मुलांना लहानपणापासूनच पैशाचे महत्व , पैशाची बचत करणे का आवश्यक आहे हे शिकवणे गरजेचे आहे ही गोष्ट त्यांच्या आयुष्यात खूप कामी येईल । या एका गोष्टीमुळे मला आयुष्यात खूप मोठे नुकसान झाले त्यामुळे नुकसान करणारी सवय आजच मोडून टाका ।।

2 स्वतःला श्रीमंत दाखविण्यासाठी केलेला  दिखावा ।

मध्यमवर्गीय माणूस नेहमी स्वतः ला श्रीमंत दाखविण्यासाठी श्रीमंतीचा दिखावा करीत असतो , तो आपण इतरापेक्षा वेगळे कसे आहोत ? व किती अलग आहोत हे दाखविण्यासाठी नेहमी नवनवीन दिखावा करणाऱ्या वस्तु घेत असतो आणि त्यातला अनेक वस्तू या कर्ज काढुन देखील घेतल्या जातात ।

मी नोकरीला आँफिस ला जाताना इतर लोकांवर माझा प्रभाव पडावा म्हणून ब्रँडेड कपडे वापरत असे , महागड्या गाड्या वापरत असे याचा परिणाम असा होई की माझ्याकडे पगाराचा खूप कमी हिस्सा घरखर्च व इतर खर्चासाठी वाचत असे ।

आणि बचत करण्याचे तर सोडूनचं द्या जिथे खर्चालाच पैसे पुरत नसतील तर बचत कुठुन करणार ।

चुक नं 2  दिखावा

जर तुम्हाला  श्रीमंत व्हायचे असेल तर अशी चुक कधीच करू नका

भरपूर लोकांना आपली श्रीमंती दाखविण्याच्या असल्या फालतु सवयी असतात ।

समोरचा कुठलीतरी महागडी वस्तू वापरत आहे हे समजल्यावर आपली लायकी नसतानाही मी पण काय कमी आहे म्हणून तशाच प्रकारची वस्तू घेणे म्हणजे निव्वळ मुर्खपणा होय । ।

हा खोटा दिखावा करण्याची सवय आजकाल बायकांना खूप असते ,.माहेरी जाऊन नातेवाईकांसमोर नवर्याच्या व त्याच्या श्रीमंतीच्या खूप बढाया मारतात आणि मग जेव्हा त्यांच्या एखाद्या नातेवाईकांकडे कुठला कार्यक्रम असतो तेव्हा ऐपत नसताना अशा स्त्रिया नवर्याला मोठा खर्च करायला लावतात आणि मग नवरा बिचारा आर्थिक संकटात सापडतो ।

माणसाने नेहमी जे आहे तेच दाखवावे ,. श्रीमंत लोकांना दुसरे काय विचार करतात याबद्दल विचार करायला अजिबात वेळ नसतो त्यामुळे ते दिखावा करण्यात वेळ घालवत नाहीत ,

म्हणून दिखावा नकोच आपल्या ऐपतीप्रमाणे वागावे ।।

3 कर्ज काढुन घर बांधले

नोकरीत बर्यापैकी स्थायी झाल्यानंतर कुटुंबासाठी नवीन घर बांधले , काही पैसे कमी पडत होते तर त्यासाठी कर्ज घेतले पण काही दिवसांनी मोठ्या भावासोबत छोट्याशा मुद्द्यावरून वाद झाला तर परत त्या घरी गेलो नाही ।

पण मला त्या घराचे सर्व कर्जाचे हप्ते फेडावे लागले यासाठी बरेच वर्षे लागली व मी अशी गोष्ट कर्ज घेऊन केली होती जिचा मला काहीही फायदा झाला नाही ।

घर बांधताना किंवा लग्न करताना कर्ज काढताना खूप विचार करून निर्णय घ्या कारण या गोष्टीत खर्च केलेला पैसा आपल्याला दीर्घकाळ परत करावा लागतो कारण मोठी रक्कम असते  ।

शक्यतो कोणताही मोठा खर्च करताना शक्यतो कमीत कमी 50% रक्कम आपल्याकडे असावी व जर सर्वच पैसा असेल तर खर्च करायला काही हरकत नाही पण मी असे अनेक मध्यमवर्गीय कुटुंब बघतो की जे खूप पैसा कर्ज म्हणून लग्न आणि घरासाठी घेतात व समोरची कितीतरी वर्षे मग नुसते कर्जाचे हप्ते भरण्यात घालवितात ।

सुरवातीला कर्ज काढुन अतिशय मजा केली जाते पण नंतर इएम आय भरण्यासाठी खूप काटकसर केली जाते ।

मी नोकरीत चांगली बचत करून कमाई केली होती पण नंतर घर घेण्यात व त्याचे हप्ते फेडण्यासाठी अनेक वर्षे गेली ।

पुन्हा कर्जबाजारी होईल या भितीने मला त्यावेळी लग्नाची खूप भिती वाटायची ।

चांगली नोकरी मिळाल्यामुळे सुधारलेली माझी जिंदगी परत कर्जामुळे आर्थिक संकटात सापडली होती ।

4 व्यवसायात जम बसण्याआधीच नोकरी सोडली

घरच्यांशी वाद झाल्यानंतर मला घराचे कर्ज फेडताना नाकी नऊ येत होते ,.कर्जाचा हप्ता कटल्यावर खूप कमी पैसे वाचायचे त्यामुळे मी खूप परेशान असायचो ।

ते कर्जाचे हप्ते अजून मला खूप वर्षे भरावे लागणार होते ,.असाच एके दिवशी विचार करत असताना मला ही जाणीव झाली की जर मी तीच नोकरी करत राहील तर माझ्या आयुष्यात मी खूप काही करू शकणार नाही असे वाटायचे ।

तसं पाहिलं तर मी इएम आय भरूनसुद्धा चांगले आयुष्य जगत होतो पण जी माझी स्टांडर्ड व लक्झरीअस लाइफस्टाइल होती ती खूप बदलली होती ।

मला स्वतःला खूप गरीब झाल्यासारखं वाटत होत ।

चांगले आयुष्य जगण्यासाठी व काही मोठं करून दाखविण्यासाठी लगेच नोकरी सोडली व नोटीस पिरेड वर असताना एक स्वतःचा व्यवसाय चालू केला ।

व्यवसायासाठी पैसे नव्हते पण काही मित्रांकडून पैसे गोळा केले व काम चालू केले ।

पण व्यवसाय नवीन असल्यामुळे मला काही त्यात फायदा होत नव्हता , नोकरी सोडताना खूप लोकांनी मला समजाविण्याचा प्रयत्न केला होता पण मी स्वभावाप्रमाणे कोणाचेही ऐकले नाही व ज्या ठिकाणी मला महिन्याचा पगार येत असे तोही येणे आता बंद झाला ।

आता मला कर्जाचे हप्ते भरण्यासाठी अजून कर्ज घ्यावे लागत होते व व्यवसायासाठी घेतलेले मित्रांचे पैसेही अंगावर होतेचं.

थोडक्यात काय तर माझ्या विनाशकारी विपरीत बुद्धीने  मला खूप मोठ्या कर्जाच्या संकटात ढकललेले होते ।

नोकरी सोडताना माझ्यातला जो वाघ जागा झाला होता त्याचा आता पूर्णतः उंदीर झालेला होता ।

5 संकटात नेहमी एकटचं लढावं लागतं ।।

या भल्या मोठ्या कर्जाच्या संकटात सापडलो असताना मी पुन्हा एका खाजगी ठिकाणी नोकरी चालू केली ज्यामुळे मला बर्यापैकी पैसे मिळत होते व सोबतीला व्यवसाय ही चालवत होतो ।

आपल्या वर जेव्हा संकट येते ना तेव्हा आपल्यासोबत कोणीच राहात नाही ,.एकट्यालाच लढावं लागते या गोष्टी चा अनुभव तेव्हा पहिल्यांदा आला ।

जेव्हा तुमच्या कडे पैसा व सर्व काही बरोबर असते तेव्हा लोक तुम्हाला हवी ती मदत करतात ,.तुमच्या मागे मागे करतात पण जेव्हा परिस्थिती खराब होते तेव्हा कोणीही मदत करत नाही ।

संकटात सापडलेल्या व्यक्तीला नेहमी लोकं बँकेप्रमाणे ट्रीट करतात जसे बँका कशा अशाच व्यक्ती ला लोन देतात की ज्याच्या कडे आधीच पैसे आहे अशा ,.कारण पैसे देताना तो परत देईल की नाही हे पाहिले जाते त्याचप्रमाणे मदत करताना लोकं गरजू व्यक्तीला कधीही मदत करत नाहीत कारण ते आपला पैसा परत मिळेल की नाही याची चिंता करीत असतात ,. दुसऱ्याच्या खराब परिस्थिती चे लोकांना काही देणेघेणे नसतेचं ।

जेव्हा पण माणसावर संकट येत तेव्हा त्याने त्या संकटाशी एकट लढण्यासाठी तयार असाव कारण कोणीही मदतीला येणार नसतं , नातेवाईक , मित्र संकटाच्या काळात पळून जातात .  काही साथ देणारेही असतात पण ते नशीबवाल्यांनाच मिळतात ।।

6 पैसे कमविताना  शिक्षण घ्यावे की नको ??

संकटातून मार्ग काढता काढता कठिण परिस्थितीतून चांगले दिवस यायला लागले , व्यवसाय वाढीस लागला ।

मला दुसरीकडे नोकरी करण्याची गरज उरली नाही व मी काही कामगारांना ही कामावर ठेवू शकलो ।

परिस्थिती सुधारली होती पण जास्त नाही कारण कर्जाचे हप्ते फेडून व कामगारांचे पगार देऊन जास्त काही उरत नव्हते ।

मला सारख असं वाटायचं की मी कुठेतरी कमी पडतोय म्हणून ।

माझ्या जवळ व्यवसायिकाजवळ लागणारे काही कौशल्य नव्हते जसे की विक्री कौशल्य ,.टीम मँनेजमेंट इत्यादी ।

मग मी ते शिकण्यासाठी काही कोर्सेस करण्याचे ठरविले ।

हे करताना माझे मित्र मला हसायचे कारण नुपरित तेरावा महिना म्हणून आता या वयात अशा परिस्थितीत हा काय शिकतोय म्हणून मला मूर्ख समजायचे पण मी नवीन गोष्टी शिकणं  कधीही सोडलं नाही ।

शहरातील एका नावाजलेल्या व्यक्तीकडे मी entrepreneur skill शिकायला जायला लागलो व त्या त्या गोष्टी आत्मसात करायला लागलो ज्या मला येत नव्हत्या ।

यादरम्यान तिथे माझी अनेक मोठमोठ्या लोकांशी तिथे ओळख झाली ।

ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले व मैत्रीचे रूपांतर व्यावसायिक भागीदारी मध्ये ।

मला त्याठिकाणी अनेक मंडळी मिळाली जी नंतर माझ्या व्यवसायात माझी भागीदार झाली व माझी फायनान्स ची चिंता पूर्णपणे मिटली होती ।

माणसाने कधीही शिकणे सोडू नये , आयुष्यात प्रत्येक दिवस हा आपल्याला नवनवीन गोष्टी शिकवत असतो ।

7 संधीचे सोने

चांगले मोठमोठे भागीदार मिळाल्यामुळे व्यवसायाने जोरात वेग धरला होता आणि त्यासोबतच एक महत्त्वाची घटना घडली ।

एका कंपनीला आमचं काम खूप आवडलं व त्यांनी आम्हाला खूप मोठं कामाचं कंत्राट दिलं या एका कंत्राटामुळे माझ्या आयुष्याला एक वेगळी दिशा मिळणार होती , म्हणून मी अहोरात्र मेहनत घेत होतो ।

बरेचदा आपण आयुष्याकडे सर्व काही गोष्टी एकसाथ मागत असतो पण आयुष्य आपली परीक्षा घेत असते । सर्व प्रथम ते आपली मेहनत बघते ,.दुःख सहन करण्याची शक्ती बघते , व यातुन पास झाल्यावर  मग भरभरून आपल्या झोळीत टाकते ।

मी ते काम यशस्वी पणे पूर्ण केलं व खर्या अर्थाने संधी चे सोने केले ।

या कामातून मला खूप पैसा मिळाला , माझी सर्व कर्जे व देणदारी एका कंत्राटातून संपून गेले ।

पुन्हा सर्व काही व्यवस्थित झाले होते पण मला भिती वाटत होती कारण माझं आयुष्य कसं आहे की एका संकटातून निघालो की लगेच दुसरं येतं ।

आणि झालंही तसंच .

8 नोकरी की व्यवसाय

माझे नोकरी सोडण्यापूर्वी चे बँकीग करिअर खूप प्रभावशाली राहिले होते , प्रत्येक वर्षी मला कुठला ना कुठला अवार्ड मिळत असे ।

आँफिस मध्ये अत्यंत हुशार म्हणून माझी नेहमी चर्चा व्हायची ।  माझा बाँस नेहमी माझ्यावर मोठमोठ्या जबाबदार्या सोपवित असे व माझ्या हुशारीमुळेच मला विभागीय कार्यालयात बोलविण्यात आले असे माझे सहकारी त्यावेळी बोलत असत ।

नोकरी सोडून जवळपास वर्ष उलटले होते आणि मी नोकरी सोडल्यानंतर काही दिवस आर्थिक संकटात होतो त्यामुळे कधी कधी परीक्षा सुद्धा मध्ये मध्ये मी देत होतो ।

पण आता परिस्थिती सगळी बरोबर झाल्याने मी परीक्षा वगैरे देणे आता बंद केले होते ।

एके दिवशी अचानक मला एक मेल आला व ज्यामध्ये मी परीक्षा पास झाल्याचे व मुखाखतीकरिता निमंत्रण पत्र ही माहिती होती ।

तर वाचून माझा आनंद गगनात मावेनासा झाला कारण ती गलेलठ्ठ पगाराची मोठ्या पदासाठी घेण्यात आलेली परीक्षा फक्त बँकिंग क्षेत्रात काम केलेल्या व्यक्तीचींच घेण्यात आली होती व माझे रोल नं अत्यंत वरच्या लिस्ट मध्ये होते ।

म्हणजे मला लिखित परिक्षेत भरपूर मार्क्स असल्याने मी मुलाखतीत एकदम सरासरी मार्क्स जरी घेतले तरी माझे तेथे सिलेक्शन होणार होते ।

नंतर मुलाखत देऊन आलो व माझी नियुक्ती होण्याची मला शाश्वती होतीच कारण मी पैकीच्या पैकी सर्व प्रश्नांची उत्तरे  अगदी बरोबर दिली होती ।

पण परत आल्यावर पुन्हा माझ्या समोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहिला तो म्हणजे मी नोकरी करावी की व्यवसाय ?

कारण आताकुठे व्यवसायात चांगले दिवस सुरू झाले होते आणि आता मधातच पुन्हा मला नवीन नोकरीचा गाजर मिळाला होता ।

येऊ घातलेल्या नोकरीतील पद , प्रतिष्ठा व लठ्ठ पगार असल्यामुळे मी ती करावी असे भरपूर सल्ले मित्रमंडळी व शुभचिंतक लोकांकडून मिळत होते ।

मला दुसरी मोठी नोकरी मिळाली ही बातमी माझ्या व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचायला लागली ,.सर्व लोक आपापले पैसे व्यवसायातून मागे घ्यायला लागले ।

पण मला काय करावे हे समजत नव्हते ,.कारण व्यवसाय तर चांगला चालायला लागला होता पण त्यात असलेली अनिश्चितता विचार करायला लावणारी होती ।

एका अर्थाने मला ही असेच वाटतं होते की मी नोकरीत परत जावे म्हणून ।

पण तत्पूर्वी एक प्रसंग घडला ।

माझ्या आँफिसात काम करणारे काका जे माझे जुनियर होते ते अचानक एकदा रेस्टॉरंट मध्ये भेटले ।

इकडतिकडच्या गप्पा गोष्टी झाल्या तर त्यांना कोणा तरी कडून माझ्या नव्या नोकरी बद्दल कळाले होते ।

त्यांनी विचारले , काय करायचे ठरवलेस मगं नोकरी की व्यवसाय ?

मी –  आता एवढी चांगली संधी चालून आली तर करावी म्हणतो नोकरी ।

काका – मला वाटलं होत तु व्यवसाय निवडशील , तु एवढा हुशार आहेस पण कधीकधी मुर्खासारखे निर्णय घेतोस म्हणून तु आयुष्यात सर्व काही व्यवस्थित असूनसुद्धा सेटल झाला नाहीस ! तुला जर नोकरीच करायची होती तर पहिलीच कशाला सोडलीस ?  तिथेपण तु आतापर्यंत चांगल्या पदावर पोहोचला असतास च ना ? काहीपण करं निवड तुझी आहे पण एके ठिकाणी स्थिरावणं शिक । आता व्यवसाय उत्तम चालला होता ना , एका वर्षात चांगली प्रगती पण केलीस मग आता कशाला मागे येत आहेस ? आणि मागेच यायचं होतं तर पहिलेच कशाला गेलास तिकडे ?

एवढे बोलुन काका निघुन गेले व मला निशब्द करून गेले ।

नंतर मी खूप विचार केला खरं तर मी माझ्या आर्थिक गरजा पूर्ण होत नसल्यामुळे मी नोकरीचा राजीनामा देऊन व्यवसायात प्रवेश केला होता पण आता परत नोकरीत का मी जायची इच्छा ठेवत आहे असा मी स्वतःलाच सवाल केला ।

मी एक पेन व पेपर घेऊन मी माझ्या भेटणाऱ्या पगारात आणि वाढीव पगारात काय काय करू शकतो व किती वर्षे माझी नोकरी राहणार , लग्न , बायका मुलांचा खर्च , घरं इत्यादी गोष्टींचा हिशेब केला ,

त्यासोबतच व्यवसायात माझ्या कडे भरपूर संधी होत्या ।

आणि खरे पाहता माझ्या साठी व्यवसाय करणेच फायदेशीर ठरणार होते व मुख्य म्हणजे इथे कोणी माझा बाँस नसणार त्यामुळे कोणाचे ऐकावे लागणार नव्हते ।

मग मी फायनल डिसीजन घेतला व कामाला लागलो ।

पण काही दिवसांतच जोपर्यंत मी माझ्या व्यवसायात च राहण्याचा निर्णय घेतला तोपर्यंत अनेक भागीदारांनी आपली भागीदारी मागे घेतली होती कारण मी नोकरी करणार व व्यवसायाची घडी विस्कटणार असे त्यांना वाटत होते ।

त्यामुळे पुन्हा एकदा माझ्या वर  आर्थिक संकट येऊ पाहात होते ,  मोठमोठी व्यावसायिक लोकं काही महत्त्वाच्या गोष्टींची गुपिते का पाळतात याची अक्कल मला तेव्हा आली होती ।

कारण एका व्यावसायिकाने छोट्या छोट्या गोष्टींचा बाऊ करण्या आधी त्याचा आपल्या उद्योगावर काय परिणाम होईल याचा अगोदर जरूर विचार करायला हवा ।

माणसाने आयुष्यात कधीही दोन मार्गांवर चालू नये नाहीतर एक ना धड भराभर चिंध्या होतात ।

आणि जर दोन किंवा त्यापेक्षा अधिक मार्गांवर चालायचे असल्यास मुख्य मार्ग हा एकचं हवा , बाकीचे मार्ग त्याला पूरक असायला हवेत ।

उदाहरणार्थ – समजा जर एखादा शिक्षक असेल आणि तो शाळेत शिकविण्याबरोबरचं शिकवणी ही घेऊ शकतो , सोबत पेपर मासिकांसाठी लेख लिहू शकतो , पुस्तके कविता लिहू शकतो पण त्याचा मुख्य मार्ग हा शिकवण्याचा आहे ।

ज्यादिवशी तो शिक्षक शिकवण्याखेरीज इतर गोष्टी कडे जास्त लक्ष देईल त्यादिवशी त्याचा मुख्य मार्ग हा बदलून जातो ।

म्हणून माणसाने स्वतः चा मुख्य मार्ग काय हे आधीच ठरवायला हवे ।

9 व्यवसाय करताना कोणत्याही एका बँकेवर अवलंबून राहु नका

भागीदार सोडून गेल्यानंतर ते परत यायला तयार नव्हते कारण माझं काही दिवसांपासून कामात लक्ष नसल्यामुळे ते माझ्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हते ।

त्यामुळे व्यवसायात मोठ्या प्रमाणावर पैशांचा तुटवडा निर्माण झाला ।

त्यातल्या त्यात आणखी एक घटना घडली ती म्हणजे ज्या बँकेत आमचे जास्त व्यवहार होत होते त्या बँकेवर रिजर्व बँकेकडून

काही दिवसांसाठी पैसे काढण्यासाठी अनेक निर्बंध घालण्यात आले कारण त्या बँकेने नियमांना धाब्यावर बसवून अनेक कर्जे वाटली होती व त्यामुळे बँकेच्या एनपीए मध्ये वाढ झाली होती । आता तुम्ही म्हणाल बँकेत काम करूनसुद्धा तुम्हाला पहिले समजले नाही का ?  तुमची गोष्ट खरी आहे कामाच्या धुंदीत या गोष्टी विसरूनच गेलो होतो , खरतरं व्यवसाय करताना आपल्या वित्तसंस्थांची आर्थिक पत काय आहे याची जाण प्रत्येक व्यावसायिकाला असणे हेसुद्धा जरूरी आहे ।

त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैशांचा तुटवडा निर्माण झाला व परत मी आर्थिक संकटात सापडलो ।

काही दिवस या टेंशनमुळे  खूप नाराज होतो पण माझ्या कामगारांनी मला काही दिवसांसाठी परिस्थिती सामान्य होईपर्यंत मदत म्हणून काही त्यांच्या कडचे पैसे गोळा करून दिले , तेव्हा माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आले ।

ज्या लोकांना सोडून ज्यांच्या कामाची पर्वा न करता मी व्यवसाय सोडून जाणार होतो त्याच लोकांनी संकटात माझी मदत केली ।  त्यादिवशी अजून एक गोष्ट शिकायला मिळाली ती म्हणजे व्यवसाय करतांना आपल्यासोबत काम करणाऱ्या व्यक्ती व त्यांचे कुटुंब यांची जबाबदारी पण आपल्या वर असते म्हणून कोणताही निर्णय घेताना सर्व प्रथम कामगारांचा विचार जो करेल तोच खरा व्यावसायिक असतो ।

नंतर कामगारांच्या पैशांनी तुटवडा भरून न निघाल्यामुळे मी परत कर्ज घेतले व काही दिवसांतच परिस्थिती सामान्य झाली ।  बँकेत व्यवहार सामान्य झाले ।

मी काही खूप मोठा व्यावसायिक नाही पण मी आज जे करतो आहे ते स्वतःच्या मनाला पटणारं काम करत आहे व माझा मालक मी स्वतःच आहे , मला कोणीही रोकणारा टोकणारा बाँस नाही , माझा बाँस मीच आहे ।

मी माझ्या जीवनात अनेक आर्थिक समस्यांना लहानपणापासून तोंड देत आहे पण मी कधीही या समस्यांना भिऊन पळून गेलो नाही , नेहमी सामोरे गेलो ।

कोणीही मदत करायला नाही असे वाटत असताना देखील कोणी ना कोणी देवदूत बनून मदतीला यायचा ।

दोस्तांनो कर्जाचा डोंगर प्रत्येकावर असतोच घाबरून जाऊ नका , प्रयत्न चालू ठेवा काही ना काही मार्ग अवश्य निघतोच ।

10 कमाईची इतर साधने

व्यवसाय किंवा नोकरी किंवा शेती असे कोणतेही काम करताना जे लोक नेहमी कर्जबाजारी असतात त्यांच्यात एक सामान्य काँमन  गोष्ट असते ती म्हणजे आपण लोक नेहमी एकाच गोष्टी वर किंवा उत्पन्नाच्या साधनांवर अवलंबून असतो ।

माणसाने कमाईची इतर साधने जी आपल्या व्यवसायास पूरक आहेत अशी शोधावयास हवी त्यामुळे कमाईत वाढ होईल व आपला मुख्य व्यवसाय संकटात असताना इतर साधने आपल्याला मदत करतील ।

कर्जाचा डोंगर ही एक छोटीशी गोष्ट लिहिण्याचा उद्देश हाच आहे की कर्जात बुडालेल्या शेतकरी , नोकरदार , व्यावसायिकांना एक सकारात्मक संदेश मिळेल व ते कुठल्याही आर्थिक संकटाला घाबरून जाणार नाहीत ।

लिहिलेल्या काही गोष्टी जर तुम्हाला आवडल्या नसतील माफी असावी ।

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आपण आपल्या कर्मानेच आपले भविष्य बदलू शकतो ।

धन्यवाद ।।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: