#समाजाच्या फायद्यासाठी संघटित होणे खुप आवश्यक !!

डॉ  बाबासाहेब  आंबेडकरांनी समाजाला एकत्र  करून आपले हक्क  मिळवण्यासाठी जागे केले , त्यांनी दलित समाजाला नवी वाट दाखविली ।

राजकीय इच्छाशक्ती शिवाय मागासवर्गीय लोकांचा विकास होणे शक्य नाही हे बाबासाहेबांनी हेरले होते कारण कितीही कायदे झाले तरी जोपर्यंत राजकर्त्यांची सर्व समावेशक विकास करण्याची इच्छा राहत नाही तोपर्यंत गरिबांचा विकास होणे शक्य नाही ।

यासाठी सरकार मध्ये आपले प्रतिनिधित्व असणे आवश्यक आहे म्हणूनच बाबासाहेबांनी स्वतंत्र मतदारसंघाचा आग्रह धरला होता पण पुणे करारामुळे त्यामध्ये बाबासाहेबांना काही प्रमाणात वाटाघाटी कराव्या लागल्या ।

आंबेडकरी समाजाने आपली प्रगती करण्यासाठी राजकीय सत्ता हस्तगत करणे किंवा राजकीय सत्तेत प्रधिनिधीत्व करणे गरजेचे आहे ।

बाबासाहेबांच्या नंतर बरीच नेतेमंडळी झाली , त्यांनी समाजासाठी कार्य सूरू ठेवले ।

बाबासाहेबांनी समाजाच्या विकासासाठी आपले ऐक्य असणे खूप आवश्यक आहे असे म्हटले होते म्हणूनच त्यांनी शिका , संघटित व्हा आणि संघर्ष करा असा उपदेश केला होता ।

पण आपल्या लोकांनी त्यांचे काहीही ऐकलेले दिसत नाही कारण आताचे दलित समाजाचे प्रत्येक नेतेमंडळी हे आपापल्या राजकीय फायद्यासाठी अलग अलग झालेले आहेत किंवा काही लोकांनी त्यांना जाणूनबुजून अलग अलग पाडून दलित चळवळीला खिंडार पाडण्याचे काम केलेले दिसते ।

जेव्हा नेते एकत्र होते तेव्हा आपल्या समाजाचे लोक नोकरीत यायला सुरुवात झाली होती , समाजाचा विकास व्हायला लागला होता व बाकीचे राजकीय पक्षही आपल्याला एक राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून बघायला लागले होते ।

नंतर नेत्यांमध्ये फूट पडल्यावर दलित नेत्यांची खूप केविलवाणी अवस्था झाली.

कोणी एका जागेसाठीच खुष असतो तर कोणी एखाद्या पदामुळे ।

बरं जर ही नेतेमंडळी अलग होण्याची कारणे बघितली तर प्रामुख्याने कोणी आपले वजन वाढविण्यासाठी किंवा अध्यक्षपद मिळविण्यासाठी अलग झाले तर कोणी कोणाच्यातरी ताटाखालचं मांजर झाले ।

अरे ज्या बाबासाहेबांनी एकटं असताना , कोणाचाही राजकीय, आर्थिक पाठिंबा नसताना एकतर्फी बाजू लढवून आपल्या समाजासाठी व देशासाठी आपले जीवन वाहून घेतले ते त्यांचे लोकं एखाद्या पक्षाची किंवा नेत्याची चाटुगिरी करतात तेही फक्त थोड्याशा वैयक्तिक फायद्यासाठी …. खरचं वां रे चांगलं शोभतयं तुम्हाला ।

जयभिमवाला समाज हा खरचं बाबासाहेबांनी जागा केला पण काही लोकांनी या समाजातील लोकांना त्यांची किंमत लावून खरेदी केले ।

व आपले जयभिमवाले त्यांच्या या भूलथापांना बळी पडलेही ।

आपण इतर लोकांच्या राजकारणाकडे बघा ते मेल्यानंतर ही त्यांच्या वारसांना त्यांचे लोक जपतात पण आपल्या समाजात बाबासाहेब गेले तेव्हापासून असा एकही नेता झाला नाही जो संपूर्ण समाजाला एकत्र करून त्यांना मार्गदर्शन करेल ।

आजची नेतेमंडळी ही संकुचित विचासरणीची व आपलाच वैयक्तिक विचार करणारी आहेत असेच वाटते , बहुतांश नेतेमंडळी ही लोकं आपलं ऐकतच नाहीत असे म्हणतात पण लोकं तुमचं का ऐकतील ? कारण लोकांना इतिहास माहिती आहे ना ।  पहिले तुम्ही लोकांसाठी काहीतरी करून दाखवा मग लोकं तुमचं आपोआप ऐकतील ।

नामांतर आंदोलनाच्या निमित्ताने चांगली चळवळ उभी राहिली होती पण नंतर त्याही चळवळीत गटबाजी झाली व त्याचेही विरोधकांनी बरोबर तुकडे केले , विरोधकांना म्हणण्यापेक्षा आपणचं आपल्या पायावर कुर्हाड मारून घेतली असे म्हणायला हरकत नाही ।

आज आपल्या समाजात भरपूर नेते आहेत व ते चांगला मानसम्मान ही मिळवून आहेत पण जेव्हा समाजासाठी काही करायची किंवा बोलायची वेळ येते तेव्हा त्यांना स्वतंत्र बोलता नाही कारण ज्या पक्षाच्या मर्जीत राहून ते राजकारण करतात त्या पक्षाची त्यांना परवानगी घ्यावी लागते , किंवा जर तो पक्ष नाराज झाला तर मगं आपल्या पोटापाण्याच काय हा विचार त्यांच्या डोक्यात येतो ।

खरंतर राजकारण करताना आता आपल्या लोकांनी बुद्धीचातुर्याने राजकारण करण्याची गरज आहे कारण लोक आपल्याला मते मागायच्या वेळी बाबासाहेबांचा फोटो घेऊन घरी येतात पण निवडून आल्यावर लगेच दलितविरोधी कारवाया करतात आणि अशावेळी आपले नेते इच्छा असतानाही काहीच करू शकत नाहीत ।

म्हणून आता जर नेते एकत्र व्हायला तयार नसतील तर समाजानेच एकत्र यावं व जो व्यक्ती खरचं आपल्यासाठी कार्य करायला तयार असेल व जो कधीही कोणापुढे थोडाश्या चिरीमिरी साठी झुकणार नाही अश्याच व्यक्तीला आपला नेता म्हणून निवडावे ।

कारण जर आता आपण एकत्र आलो नाही तर समोरची परिस्थिती खूप भयानक असणार आहे कारण नोकर्यामध्ये झालेल्या कपातीमुळे आपली शिकलेली मुले घरी बेरोजगार पडलेली आहेत , पैसे नसल्यामुळे आपण कोणते उद्योग व्यवसाय सुद्धा करू शकत नाही आणि आपल्या बांधवांकडे करायला योग्य प्रमाणात शेती सुद्धा नाही , जास्तीत जास्त बांधव हे अल्पभूधारक शेतकरी किंवा मजूरी करताना दिसतात , यामुळे आपण आर्थिक पातळीवर मागासलेले आहोत ।

खरं तर आता अन्याय करण्याचे स्वरूप हे पूर्णपणे बदललेले दिसते , आता विरोधक हे आर्थिक अन्याय करीत आहेत म्हणजेच आपले जास्तीत जास्त लोक ज्या सरकारी नोकरी वर अवलंबून होते त्या नोकर्या कमी करण्यात आलेल्या असून यामुळे समाजाचं कंबरडे मोडण्याचे काम झाले आहे ।

आता नोकरी नाही तर घरी आवक नाही मग तुम्ही कसा संघर्ष करणार ??

दलित समाजाला जर आपली प्रतिष्ठा मिळवायची असेल तर आपण आर्थिक पातळीवर विचार करणे अतिशय महत्वाचे आहे ।

नोकरी करून स्वतः चे पोट भरण्याचे विचार सोडून समाजासाठी एखादा उद्योग व्यवसाय चालू करावा व त्यामध्ये समाजातील लोकांना नोकरी द्यावी यासाठी समाजातील पुढारलेल्या ,.पैसेवाल्या लोकांनी यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे ।

जे लोक मोठ्या पदावर कार्यरत आहेत त्यांनी सामाजिक बांधिलकी जपून आपल्या बांधवांना मदत केली पाहिजे नाहीतर येणारा काळ खूप कठीण होऊ शकतो ।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: