#बाबासाहेबांचा फोटो

मी महार , जात सांगण्याचे कारण असे की काही जातीवर लिहीत आहे त्यामुळे समोरचं वाचण्याअगोदर आपल्याला कळलेल बरं नाहीतर जातीप्रथा मानणारे वाचक उगीच वेळ वाया गेला असे म्हणतील।

एका नातेवाईकाने खूप मोठे घर बांधले, घरामध्ये सगळ्या सुखसोयी व  महागड्या वस्तू घेतल्या, घर कसले बंगलाच ना तो, तसा नातेवाईक आपला तेवढा अभ्यासात खूप हुशार व मेहनती ही पहिलेपासूनच होता, त्याला शिक्षणाची किंमत माहिती होती म्हणून गरिब परिस्थितीतही चांगला अभ्यास करून पट्टयाने चांगली नोकरी मिळवली । नोकरी मिळवली पैसा कमावला व प्रेमविवाह केला, त्याला सुंदर बायको मिळाली तीही नोकरी करते,  थोडक्यात दोघंही भरपूर कमाई करतात व ते आनंदी जीवन जगतात।

आता जेव्हा घराच्या वास्तूपूजनाला आम्ही गेलो तर काही वेगळंच  चित्र दिसत  होतं म्हणजे आमच्या जयभिमवाल्या लोकांमध्ये एखाद्या बौद्ध भिक्खु ला बोलवून परित्राण पाठ केले जाते पण तिकडे असं काही नव्हतं,  बरं मला वाटलं हे लोक जास्त पैसेवाले आहेत त्यामुळे हे थोडं माँडर्न टाइप चं वास्तूपूजा असेल त्यामुळे आपल्याला काहीच समस्या नव्हती कारण निव्वळ दिखावा करण्यापेक्षा आचरणवादी असणे केव्हाही चांगले।  

वास्तूनिमित्त भव्य भोजन होतं, शहरामध्ये याला ब्युफे म्हणतात तर त्या ब्युफेचा आस्वाद घेतला व घर बघण्यासाठी आत गेलो तर खूपच सुंदर घर होते, जे कधी स्वप्नातही पाहिलं नाही त्या सर्व वस्तू त्या घरात होत्या पण एक गोष्ट नव्हती त्या गोष्टीचा खूप शोध घेतला पण ती गोष्ट काही भेटली नाही। असं वाटलं घर सजविताना लक्षात राहिलं नसेल,विचारून बघावं पण अशा वेळेस म्हणण योग्य नव्हत, वाटलं कार्यक्रम आटोपल्यावर निवांत बोलू व तो विचार काही क्षणांसाठी टाळला।

पण आमच्या कुठल्याही कार्यक्रमात दारू आणि बेवडे हे असतातच,  कितीही मोठा कार्यक्रम असूद्या काही असे असतात कि ज्यांना लावल्याशिवाय कार्यक्रम असल्यासारखे वाटतचं नाही तर असाचं एक तळीराम पुढे आला व त्याला म्हटला,  कि  “ घर तर खुप छान बनविलेस पण बाबासाहेबांचा फोटो का नाही तुझ्या घरात? “   अगदी मीही त्याला हेच विचारणार होतो ।

“ फोटो ची काय गरज “ नातेवाईकाने उत्तर दिले।

या प्रतिप्रश्नामुळे नातेवाईकाचा खूप राग आला , त्याला ओल्या बांबूने नागडा करुन मारावा असे वाटत होते पण स्वतःवर कंट्रोल करून कार्यक्रम सोडून घरी आलो आणि विचार करू लागलो कि “घरामध्ये बाबासाहेबांच्या फोटोची काय गरज ?”

मला आठवते लहान असताना परिस्थिती एकदम जेमतेम होती तेव्हा बाबासाहेबांच्या फोटो कडेच बघुन हिम्मत वाढायची, कारण सुटाबुटातले बाबासाहेब पाहून शिक्षणच आपल्याला तारू शकणार हे समजले होते, आई कधीकधी त्याच फोटो कडे बघुन रमाईच्या गोष्टी सांगायची,  आपल्याला स्वतःला उच्चवर्णीय समजणारे लोक आम्हाला कशी हीन दर्जाची वागणूक देत होते व साहेबांनी आपल्या साठी कसे कष्ट सोसलेले आहेत याची जाणीव करून द्यायची , जेव्हा शाळेचा, अभ्यासाचा कंटाळा यायचा तेव्हा त्याच फोटोकडे बघुन विचार यायचा कि हा माणूस वर्गाच्या बाहेर बसून शिकला म्हणून आपल्याला वर्गात प्रवेश मिळाला आणि ही मिळालेली संधी आपण व्यर्थ घालवायची का ? त्या फोटो मुळे माझं अख्ख आयुष्य बदललं ।   या फोटो मुळे कधी कोणाची फसवणूक केली नाही, चोरी केली नाही व आपल्या विद्येचा चुकीचा उपयोगही केला नाही फक्त या फोटो मुळे माझ्या बाबाच्या फोटो मुळे मग आता जर मी जास्त पैसा कमावला, श्रीमंती आली तर फोटो काढून घ्यायचा काय?  म्हणजे मी जयभिमवाला आहे याची लाज बाळगायची का?  बाबासाहेब म्हणाले होते कि, “ज्यांना इतिहास माहिती नाही ते नवीन इतिहास घडवू शकणार नाहीत “ मग जर आपण आपल्या मुलांना बाबासाहेबांचे विचार सांगू नाही, त्यांचे फोटो लावू नाही तर त्यांना कसे कळेल कि आपण इथपर्यंत किती संघर्ष करून आलो म्हणून, मी मान्य करतो कि दुसर्‍या जाती धर्माच्या मुलींशी लग्न केल्यानंतर त्यांच्या रिती, परंपरा आपल्यात काही प्रमाणात येतात व प्रेमासाठी त्या स्वीकाराव्या पण लागतात पण म्हणून काय आपल्या इतिहासाला सोडून द्यायचं काय?  

दुसरे लोक आपल्याशी  लग्न करतात कारण आपल्याकडे शिक्षण, विद्वता आहे म्हणून, विद्वत्ता आहे म्हणूनच नोकरी ,व्यवसाय आहे व त्यामुळेच पैसा । मग हे जर नसेल तर किती पण प्रेम का असणार कोणती मुलगी आपल्याशी लग्न करणार का ? हे नसताना ती फक्त आणि फक्त आपली जात काढणार, म्हणून आपण ज्यामुळे आहो त्याला कधी सोडू नका  ।

त्या बाबाला विसरू नका आणि फोटोलाही विसरू नका।

आता तुम्ही म्हणाल ही गोष्ट तुम्ही नातेवाईकाला का नाही सांगितली?  तर तो ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही तो हे सगळं हसण्यावारी नेईल, आपल्याला मुर्ख समजेल व तो एकटाच नाही त्याच्यासारखे खूप आहेत जे असे करत आहेत म्हणून हा लेख लिहित आहे, जर तुम्हाला पण असे जे पण युनिक कारण माहिती असेल कि बाबांचा फोटो घरात का ठेवावा तर????  ते कारण कमेंट बाँक्स मध्ये नक्की लिहून पाठवा,  व आपण जयभिमवाले आहोत ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे

हे सांगण्यासाठी याला जास्तीत जास्तं शेयर करा।।।। जयभिम।।।।

पुन्हा एक जोडतो,  दुसर्‍या जाती, धर्माच्या लोकांचा तिरस्कार करण्यापेक्षा स्वतःच आधी सुधरा,  आपण किती चांगले आहोत हे दुसऱ्याला समजावून सांगण्यापेक्षा, आपल्या आचरणातून दिसलेले केव्हाही चांगले।

जो दुसर्‍यांचा तिरस्कार करतो तो बाबासाहेबांचा अनुयायी असूच शकत नाही।

बुद्धाने संपूर्ण जग सुखी व्हावे असे सांगितले आहे  ,त्याकरिता “ सब्बे सत्ता सुखी होन्तु “ हे वाचून, समजून घेतले व आचरणात आणले तर आपले जीवन एका वेगळ्याच उंचीवर जाऊ शकेल।

Leave a Reply

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

%d bloggers like this: